दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मदत द्या; रोहित पवारांचा सरकारला १०-१२ दिवसांचा अल्टिमेटम
बीडच्या मोर्चातून मागणी; ‘निर्णय घेतला नाही तर सरकारला हे महागात कसं पडेल, आम्ही घोषणा करणार’ असा इशारा

बीड : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सरकारने पुढील १० ते १२ दिवसांत शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
बीड येथे आयोजित मोर्चादरम्यान रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका केली. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी म्हटले. दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
‘हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. कर्जमाफीपासून मोठ्या संख्येने शेतकरी वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना मदत, रोजगार आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असे रोहित पवार यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.
रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी यापूर्वीही केली आहे. तसेच शेतीमजुरांसाठी २५ हजार रुपये मदत आणि दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा – ‘ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’; राज ठाकरेंचे विरोधकांना आंदोलनाचे आवाहन
‘१०-१२ दिवसांत निर्णय घ्या’
सरकारने पुढील दहा-बारा दिवसांत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला नाही, तर सरकारला हे महागात कसे पडेल, याची घोषणा केली जाईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिकांचे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून राज्यात राजकीय नेत्यांकडून सरकारवर दबाव वाढत आहे. शरद पवार यांनीही दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.
शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याची मागणी
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे खतांसह शेतीचा उत्पादन खर्च वाढल्याचा मुद्दाही रोहित पवार यांनी उपस्थित केला. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळणे आवश्यक असून, भविष्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारकडून दुष्काळसदृश परिस्थितीचे मूल्यांकन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभावित भागांची पाहणी केली असून, प्राथमिक माहितीच्या आधारे दुष्काळाबाबत लवकर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.





