‘प्रभाव असणं म्हणजे कायद्यापासून सूट मिळणं नव्हे’; सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर तुकाराम मुंढेंची स्पष्ट भूमिका
‘सार्वजनिक आरोग्यापेक्षा व्यावसायिक हिताला अधिक महत्त्व देता येणार नाही’; विमल इलायची जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना नोटिसा

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध कलाकारांनी आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचे समर्थन करू नये, असे आवाहन केल्यानंतर मुंढे यांनी त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सेलिब्रिटींच्या कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला.
‘प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असणं म्हणजे कायद्यापासून सूट मिळणं नव्हे. कलाकारांनी इतर नागरिकांप्रमाणेच कायद्याचा आदर केला पाहिजे,’ असा संदेश मुंढे यांनी दिला. प्रभावशाली व्यक्ती एखाद्या उत्पादनाची जाहिरात किंवा समर्थन करते, तेव्हा त्याचा लोकांच्या निवडीवर आणि विशेषतः तरुणांच्या निर्णयांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा विचार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रात व्यापक जनहिताच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरणाऱ्या काही उत्पादनांच्या जाहिरातींबाबत यापूर्वीच कलाकारांना नोटिसा बजावल्याचा उल्लेख केला. कायदा सर्वांसाठी समान असून, कोणालाही कायद्यापेक्षा मोठे स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यावसायिक हितापेक्षा सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हेही वाचा – सामाजिक न्याय विभागातील ३९ नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे; एकनाथ शिंदेंचे लोकाभिमुख कामाचे आवाहन
विमल इलायची जाहिरातप्रकरणी नोटिसा
महाराष्ट्र FDA ने ऑगस्टमध्ये शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीसंदर्भात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. FDA च्या म्हणण्यानुसार, या जाहिरातीमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला उत्पादनाची अप्रत्यक्ष किंवा ‘सरोगेट’ जाहिरात होत असल्याचा प्रथमदर्शनी आक्षेप आहे. संबंधित कलाकारांना जाहिरातीतील सहभागाबाबत स्पष्टीकरण देण्यास तसेच संबंधित प्रचारात्मक सामग्रीबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले होते.
या प्रकरणात FDA ची कारवाई जाहिरातदार आणि सेलिब्रिटींच्या जबाबदारीच्या मुद्द्यावर केंद्रित आहे. या नोटिसांबाबत संबंधित कलाकारांची बाजू आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया स्वतंत्रपणे विचारात घेतली जाणार आहे.
राष्ट्रपती मुर्मूंचेही कलाकारांना आवाहन
दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील एकता नगर येथे झालेल्या ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकप्रिय कलाकारांच्या सामाजिक प्रभावाचा उल्लेख केला. तरुण आणि मुलांवर कलाकारांच्या शब्दांचा व कृतींचा प्रभाव पडत असल्याचे नमूद करत त्यांनी आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचे समर्थन न करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रपतींच्या या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींच्या जाहिरातींमधील कायदेशीर जबाबदारी आणि सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे.




