‘पीएम विश्वकर्मा’मधून कारागिरांना आर्थिक बळ; चंद्रपुरात टूलकिट, कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण
विश्वकर्मा जयंतीनिमित्त रोजगार मेळावा; पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे पालकमंत्री अशोक वुईके यांचे आवाहन

चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतील लाभार्थी कारागिरांना टूलकिट, प्रमाणपत्रे आणि बँक कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले. यावेळी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागीर आणि शिल्पकारांना योजनेअंतर्गत उपलब्ध विविध लाभांची माहिती देण्यात आली.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
‘पीएम विश्वकर्मा’ योजना पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे पालकमंत्री अशोक वुईके यांनी सांगितले. पारंपरिक कौशल्याला आधुनिक साधने, प्रशिक्षण, वित्तीय सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या मॉडेल नोंदणी कार्यालयांची देशभर चर्चा; पुण्याच्या धर्तीवर केंद्राकडून विस्ताराचे निर्देश
कारागिरांनी पारंपरिक कौशल्याचे जतन करताना बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतून उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मीरा दिलीप गराटे, प्रकाश शामसुंदर मेश्राम, मधुकर गणपती नवघरे, पृथ्वीराज कैलास कालीवाले, दिलीप रामदास डाखोरे, रोशन शांताराम झाडे, निखील अशोक वांढरे आणि अमरजित कुमार मेहता यांच्यासह पात्र लाभार्थ्यांना टूलकिट, प्रमाणपत्रे आणि बँक कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.
‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागीर व शिल्पकारांना आधुनिक साधने, कौशल्यवृद्धी, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून अशा लोकाभिमुख योजनांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही करण्यात येत आहे.





