ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : ‘‘वायसीएम’’ रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याची वेळ!

औषधसाठा तातडीने तपासा, मोफत पुरवठा सुरू करा

– नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांची दहा मागण्यांसह प्रशासनाकडे धाव

पिंपरी- चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात डॉक्टरांनी लिहून दिलेली आवश्यक औषधे वितरण केंद्रातून मिळत नसल्याची तक्रार नगरसेवक ज्ञानेश्वर बटूराव जगताप यांनी केली आहे. त्यामुळे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना बाहेरील औषध विक्रेत्यांकडून महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. औषधांची कमतरता तातडीने दूर करण्याची मागणी त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.

महापालिका आरोग्यसेवेवर मोठा खर्च करत असतानाही रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नसतील, तर ही चिंताजनक बाब असल्याचे जगताप यांनी नमूद केले. डॉक्टरांनी चिठ्ठीवर लिहून दिलेली औषधे रुग्णालयातच विनामूल्य मिळावीत, यासाठी खरेदी, साठा व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रियेची तातडीने चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे.

रुग्णालयातील उपलब्ध आणि अनुपलब्ध औषधांचा साठा तपासून नियमित उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांची आपत्कालीन खरेदी करावी. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग आणि बालरोगावरील औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. औषध वितरण केंद्राबाहेर औषधांच्या उपलब्धतेची अद्ययावत यादी प्रसिद्ध करावी, अशा मागण्या पत्रात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –  ‘गोंधळ’ची ऑस्करवारी; मराठी सिनेमाचा पुन्हा जागतिक मंचावर डंका

औषधांच्या कमतरतेला जबाबदार असलेल्या अधिकारी, पुरवठादार किंवा कंत्राटदारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितले जात असल्यास संबंधित विभागाकडून लेखी स्पष्टीकरण घ्यावे. तक्रारींसाठी रुग्णालयात स्वतंत्र मदत व तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, असेही जगताप यांनी सुचवले आहे.

औषध खरेदी आणि वितरण व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल सात दिवसांत द्यावा, अशी मागणी पत्रात आहे. औषधांच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाच्या उपचारांत खंड पडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे रुग्णालयातच विनामूल्य मिळाली पाहिजेत. औषधांच्या तुटवड्यामुळे गरीब रुग्णांना बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने औषधसाठा, खरेदी आणि वितरणाची तातडीने तपासणी करून पुरवठा सुरळीत करावा. या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल सात दिवसांत द्यावा.”

— ज्ञानेश्वर बटूराव जगताप, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button