अंधेरीच्या राजाचा यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराचा भव्य देखावा; ६१व्या वर्षानिमित्त आकर्षक संकल्पना
‘नवसाचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंधेरीच्या राजाच्या मंडपात राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती; कला दिग्दर्शक धर्मेश शाह यांची संकल्पना

मुंबई : ‘नवसाचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाच्या गणेशोत्सव मंडपात यंदा अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराची झलक पाहायला मिळत आहे. अंधेरीच्या राजाची सुमारे ९ फूट उंच मूर्ती असून, हे मंडळ दरवर्षी भारतातील प्रसिद्ध मंदिर किंवा ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृतीवर आधारित भव्य देखावे साकारण्यासाठी ओळखले जाते. अंधेरीच्या राजाची मूर्ती अधिकृत ट्रेडमार्क नोंदणीकृत आहे.
मंडळाच्या ६१व्या वर्षानिमित्त यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. श्रीराम मंदिराच्या स्थापत्यकलेची आणि भव्यतेची झलक गणेश मंडपाच्या सजावटीतून दाखवण्यात आली आहे. मंदिराचे खांब, शिखर, मंडप तसेच आकर्षक कोरीव सजावट यामुळे भाविकांना अयोध्येतील राम मंदिराच्या वास्तुकलेचा अनुभव घेता येत आहे.
हेही वाचा – अजितदादांच्या विकासकार्याला गणेशोत्सवातून अनोखी मानवंदना
२०२६ मधील ‘अंधेरीचा राजा’चा हा विशेष देखावा भाविक आणि गणेशभक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. देखाव्याची संकल्पना सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक धर्मेश शाह यांनी केली आहे.
देखाव्याच्या निर्मितीबाबत माहिती देताना धर्मेश शाह यांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी अयोध्येतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार मंदिराच्या स्थापत्यकलेचा बारकाईने अभ्यास करून मंडपाची रचना करण्यात आली असून, भाविकांना श्रीराम मंदिराच्या भव्यतेची अनुभूती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.




