डोंबिवलीत सायबर सुरक्षेसाठी ‘सायबर वॉरियर्स’ सरसावले!
टिळकनगर पोलीस ठाण्यात विशेष जागरूकता सत्र; पोलिसांना ऑनलाइन फसवणूक रोखण्याबाबत मार्गदर्शन

डोंबिवली: डिजिटल व्यवहारांचा वापर वाढत असतानाच फ्रॉड कॉल, फसवे संदेश, बनावट लिंक आणि ऑनलाइन पेमेंट स्कॅमच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रगती महाविद्यालय आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टिळकनगर पोलीस ठाण्यात विशेष सायबर सुरक्षा जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले.
या सत्रात प्रगती महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर तनुश्री अमोल गायकवाड यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची कार्यपद्धती, संशयास्पद कॉल व संदेश ओळखण्याचे मार्ग, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ‘अँटीव्हायरस डॉट कॉम’सह विविध अत्याधुनिक सायबर सुरक्षा ॲप्लिकेशन्सची माहिती देण्यात आली. संबंधित सुरक्षा ॲप पोलिसांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ते सक्रियही करण्यात आले. फ्रॉड कॉल, फसवे मेसेज आणि पेमेंट स्कॅमपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करण्याबरोबरच मोबाईलमधील डेटा आणि आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी हे ॲप उपयुक्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ॲप सक्रिय करण्यासाठी ‘०५८’ हा कोड वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा – अंधेरीच्या राजाचा यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराचा भव्य देखावा; ६१व्या वर्षानिमित्त आकर्षक संकल्पना
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहसंचालक अजय शिर्के, सायबर वॉरियर्स तनुश्री अमोल गायकवाड आणि सृष्टी संजय पाटील यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे पोलिसांना सायबर गुन्ह्यांच्या बदलत्या स्वरूपाची माहिती मिळण्यासह प्रतिबंधात्मक उपाय समजून घेण्यास मदत झाली.
दरम्यान, देशभक्त मित्र मंडळाने सायबर जागरूकता अभियानासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले. नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध करण्यासाठी पोलीस, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
सायबर गुन्ह्यांविरोधात सामूहिक लढ्याची गरज
सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन तंत्रांचा वापर केला जात असल्यामुळे नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी अथवा बँकविषयक गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये आणि संशयास्पद व्यवहार झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सत्रादरम्यान करण्यात आले.





