पुण्याचा सांस्कृतिक महोत्सव होणार राज्यातील नंबर वन; आशिष शेलारांची मोठी घोषणा
तीन दिवसांच्या महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गणेशोत्सवाच्या परंपरांचे जागतिक दस्तऐवजीकरण करण्यावर भर

पुणे : विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रतिसादातून पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली असून, पुढील वर्षी हा महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शेलार बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने, राजेश पांडे, श्रीपाद अष्टेकर, कलाकार अथर्व सुधामे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवामध्ये नागरिकांचा सहभाग, सामाजिक व राष्ट्रप्रबोधन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांची गर्दी, आकर्षक देखावे आणि परंपरा यामुळे या उत्सवाची व्याप्ती मोठी आहे. जगात अशा व्यापक स्वरूपाचा उत्सव अन्यत्र आढळणे कठीण असल्याचे शेलार यांनी नमूद केले.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विधानसभेच्या पटलावर ऐतिहासिक निर्णय घेऊन गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले.
हेही वाचा – पाटणच्या विकासकामांसाठी शासनाकडून निधी; पाणी, स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य
‘bappa.org’च्या माध्यमातून सांस्कृतिक दस्तऐवजीकरण
गणेशोत्सवाच्या घरगुती आणि सार्वजनिक परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, कथा आणि आठवणी नागरिकांनी ‘bappa.org’ या डिजिटल व्यासपीठावर शेअर कराव्यात, असे आवाहन शेलार यांनी केले. गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जगभर पोहोचविण्यासोबतच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा मान्यतेसाठी आवश्यक असलेले सांस्कृतिक दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘फोक लोक’ कार्यक्रमातील कलाकारांचे शेलार यांनी अभिनंदन केले.
हेमंत रासनेंकडून आभार
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेलार यांचे पुणेकर, गणेशभक्त व गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.
पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात राज्य शासनाच्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल रासने यांनी शेलार यांचे अभिनंदन केले.





