पाटणच्या विकासकामांसाठी शासनाकडून निधी; पाणी, स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य
सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते व कचरा व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करून देणार; ऑक्टोबरमध्ये पाणी योजनेची चाचणी

सातारा : पाटण नगरपंचायतीकडे निधीची कमतरता असून, पाटण शहराच्या अंतर्गत विकासासाठी शासनामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. नगरपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
लोकनेते बाळासाहेब देसाई भवन, पंचायत समिती पाटण येथे पाटण नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी घेतला. या बैठकीला पंचायत समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती विजय पवार, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, गटविकास अधिकारी सरिता पवार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सत्यम जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधी
पाटण शहरातील सांडपाणी नदीमध्ये मिसळत असून, हेच पाणी तालुक्यातील नागरिकांच्या पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रक्रिया प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात आला. या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.
शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन तसेच इतर आवश्यक नागरी सुविधांच्या कामांसाठीही शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – सौदीच्या महत्त्वाच्या पाइपलाइनवर ड्रोन हल्ला; युरोपला कच्च्या तेलाचा पुरवठा थांबणार?
ऑक्टोबरमध्ये पाणी योजनेची चाचणी
पाटण नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाणी योजनेची चाचणी ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर नागरिकांना योजनेतून पाणीपुरवठा सुरू करता येणार आहे. पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे चालविण्यासाठी नगरपंचायतीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.
अतिक्रमणावर संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश
नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणांच्या प्रश्नावर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.





