TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा संताप; ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं, नाहीतर कायदेशीर पावलं उचलू’

दिशा सालियन यांना ओळखत नसल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा; ‘चौकशी होऊ द्या, मात्र चारित्र्यहनन सहन करणार नाही’

छत्रपती संभाजीनगर : दिशा सालियन प्रकरणाच्या सीबीआय चौकशीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाशी आपला किंवा आदित्य ठाकरे यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत, सातत्याने होत असलेल्या नावाच्या उल्लेखावर त्यांनी आक्षेप घेतला. “फालतू चारित्र्यहनन बस्स झालं, नाहीतर आम्हालाही कायदेशीर पावलं उचलावी लागतील,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दिशा सालियन प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी या प्रकरणाशी आपला दुरान्वयेही संबंध नसल्याचे सांगितले.

“आदित्यने याबाबत आधीच खुलासा केला आहे. या प्रकरणात कुणाचंही नाव घेतलं जात आहे. उद्या तुमचंही नाव येईल आणि तुमचंही चारित्र्यहनन होईल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. या प्रकरणात विविध व्यक्तींची नावे चर्चेत आणली जात असल्याचा संदर्भ देत त्यांनी उपरोधिक टिप्पणीही केली.

हेही वाचा –  एकनाथ शिंदेंनी गुजराती भाषेतून भाषणाची सुरुवात; मोदींच्या कर्तृत्वाचे केले कौतुक

तिला आम्ही ओळखत नव्हतो’

दिशा सालियन यांच्याशी आपली कधीही भेट झाली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. “ती मुलगी जिवानिशी गेली. आम्ही तिला ओळखत नव्हतो. तिच्याशी कधी भेट झाली नाही. तिच्याशी काहीही संबंध नाही. काय घडलं त्याच्याशी आमचा संबंध नाही,” असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी यापूर्वी सरकारकडून एसआयटी नेमण्यात आल्याचा उल्लेख करत, चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण शांत राहण्याची भूमिका घेतल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. मात्र, सातत्याने नाव जोडले जात असल्याने आता कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

आदित्य ठाकरेंनीही केला होता खुलासा

दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी दिशा सालियन यांना कधीही भेटलो नसल्याचे किंवा त्यांच्याशी आपली ओळख नसल्याचे म्हटले होते.

आपले नाव या प्रकरणाशी जोडण्यामागे राजकीय हेतू आणि वैयक्तिक द्वेष असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. तसेच अधिकृत यंत्रणांनी राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

दरम्यान, सीबीआयच्या एफआयआरमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव नमूद असणे म्हणजे त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध झाले आहेत, असा अर्थ होत नाही. या प्रकरणातील आरोप आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासाच्या प्रक्रियेत स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button