Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

बीड | “यंदा अल-निनोमुळे बीडसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. मी स्वतः एक शेतकरी आणि मराठवाड्याची लेक असल्याने मला या भीषण परिस्थितीची व शेतकऱ्यांच्या वेदनांची पूर्ण जाणीव आहे. मात्र, बळीराजाने धीर सोडू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, या टंचाईवर आपण सर्वजण मिळून एकत्रित मात करू,” असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी येथे व्यक्त केला. तसेच, परतीच्या पावसाची अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.

खरीप हंगाम आणि संभाव्य टंचाई परिस्थितीबाबत आज बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (१६) रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. टंचाईच्या अनुषंगाने राज्य शासन अतिशय गंभीर असून कॅबिनेटच्या प्रत्येक बैठकीमध्ये यावर सविस्तर चर्चा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच गावपातळीवर नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे (ऑनलाइन), आमदार विक्रम काळे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींच्या महत्त्वपूर्ण मागण्या आणि उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

नुकसान भरपाई आणि पंचनामे: पावसाचा खंड २९ दिवसांचा नसून ३६ दिवसांचा असल्याचे आमदार सुरेश धस यांनी निदर्शनास आणून दिले. तर, पिकांचे ९० ते ९५% नुकसान झाल्याने एनडीआरएफच्या (NDRF) निकषांपेक्षा अधिक मदत देण्याची मागणी आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी केली. खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकसानीची मदत सरसकट मिळावी आणि मागील काळातील प्रलंबित मदतही तत्काळ देण्याची मागणी केली. यावर, प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे अत्यंत वस्तुनिष्ठ आणि पारदर्शकपणे करून सविस्तर अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

हेही वाचा

ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

पिण्याचे पाणी आणि टँकर्स: धरणांमधील उर्वरित पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवावा आणि पाण्याचा अवैध उपसा तातडीने बंद करावा, असे कडक निर्देश देण्यात आले. भूजलाचे सातत्याने मोजमाप करावे आणि पिण्याच्या पाण्यासाठी जिथे गरज आहे तिथे टँकरचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून टँकर तातडीने सुरू करावेत. टँकर भरण्यासाठी कृषी क्षेत्रातील खासगी विहिरी अधिग्रहित कराव्यात व नवीन विंधन विहिरी घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.

बीड शहर पाणीपुरवठा: बीड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत आणि पाणीपुरवठा योजनेची थकीत वीज बिले माफ करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

चारा टंचाई आणि चारा डेपो: आष्टी तालुक्यात रेकॉर्डनुसार चारा उपलब्ध नसून परिस्थिती गंभीर असल्याने यावर मदत व पुनर्वसन विभागाकडून चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय त्वरित घेण्याचे निर्देश देण्यात आले.

जलसंधारण आणि धरणे: टंचाईच्या काळात जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत आणि स्वयंसेवी संस्थांच्या (NGOs) माध्यमातून प्रकल्पातील गाळ काढण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. जायकवाडी धरणाचा कालवा पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी मोहीम हाती घेण्याची मागणी आमदार सोळंके यांनी केली.

पीक कर्ज आणि बँकिंग: पीक कर्ज देताना ‘सिबिल’ (CIBIL) रिपोर्टमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची दखल घेत, बँकांनी सिबिलच्या आधारावर कर्ज नाकारू नये, अशी ताकीद देण्यात आली.

बैठकीच्या शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्याच्या ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’च्या (१७ सप्टेंबर) पार्श्वभूमीवर सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासनाने सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनांची गंभीर दखल घेऊन टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर कामाला लागावे, असे आदेश त्यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button