पिंपरी-चिंचवड कचरा प्रश्नावर सुलभा उबाळेंची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर!
ई-प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका अर्चना सस्ते यांचा घणाघात

मोशीकरांच्या आरोग्याचा आणि वेदनांचा विचार कोण करणार?
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा समस्येबाबत शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांची भूमिका दुटप्पी असून, राजकीय स्वार्थासाठी त्या शहराच्या हिताच्या उपाययोजनांमध्ये अडथळे निर्माण करीत आहेत, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीच्या ई-प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका अर्चना सस्ते यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण कचरा अनेक वर्षांपासून मोशी कचरा डेपोमध्ये आणला जातो. त्यामुळे मोशी आणि परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, प्रदूषण तसेच आरोग्याशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांनी वर्षानुवर्षे संपूर्ण शहराच्या कचऱ्याचा भार सहन केला आहे. तरीही शहरातील कचऱ्याचे विकेंद्रीकरण करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना विरोध केला जात असल्याची टीका सस्ते यांनी केली.
अर्चना सस्ते म्हणाल्या की, मोशी कचरा डेपो परिसरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या भीषण दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुलभा उबाळे यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले तसेच प्रशासन, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर आरोप केले. त्यानंतर शहरातील कचरा समस्येवर प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
हेही वाचा
नूतन अभियांत्रिकीमध्ये ड्रोन आणि एआय तंत्रज्ञान बूटकॅम्पचे यशस्वी आयोजन
दरम्यान, प्रशासनाने शहरातील दहा ठिकाणी नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर उबाळे यांनी त्यांच्या प्रभागातील प्रस्तावित प्रकल्पाला विरोध केला. दुर्घटनेनंतर उपाययोजनांची मागणी करायची आणि प्रत्यक्ष उपाययोजना सुरू झाल्यानंतर त्यांनाच विरोध करायचा, ही भूमिका दुटप्पी असल्याचे सस्ते यांनी म्हटले आहे. “उबाळे यांच्या प्रभागातील नागरिक माणसे आहेत आणि मोशी व परिसरातील नागरिक माणसे नाहीत का? मोशीकरांना कचऱ्याचा त्रास होत नाही का? आम्ही त्यांच्या प्रभागातच प्रकल्प झाला पाहिजे, असा आग्रह धरत नाही. मात्र, प्रत्येक पर्यायाला राजकीय विरोध केला, तर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट नेमकी कुठे लावायची, याचे उत्तर त्यांनी द्यावे,” असे आव्हान अर्चना सस्ते यांनी दिले.
भारतीय जनता पार्टी आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकारातून शहरातील कचरा समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, या प्रकल्पावरही उबाळे यांनी आरोप केले. मोशीतील दुर्घटनेवर राजकारण करायचे आणि नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही विरोध करायचा, अशी त्यांची भूमिका शहरहिताची नसल्याचे सस्ते यांनी नमूद केले.
गेल्या ७० दिवसांमध्ये शहरात सुमारे दीड लाख टन अतिरिक्त कचरा साचल्याचा दावा करीत, या कचऱ्याचे काय करायचे आणि त्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट कशी लावायची, याबाबत उबाळे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी अर्चना सस्ते यांनी केली. “सुलभा उबाळे यांनी गेली २५ वर्षे शहराच्या राजकारणात काम केले आहे. मात्र, शहराच्या प्रश्नांवर विधायक पर्याय सुचविण्याऐवजी राजकीय आरोप करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता त्यांचा दुटप्पीपणा पिंपरी-चिंचवडकरांसमोर आला असून, नागरिक त्यांना कदापि माफ करणार नाहीत,” असा आरोपही सस्ते यांनी केला. शहरातील नागरिकांनी राजकीय स्वार्थातून आणि संकुचित विचारांतून विकासकामांना विरोध करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही अर्चना सस्ते यांनी केले.
“मोशीकर अनेक वर्षांपासून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा सहन करीत आहेत. दुर्घटना झाल्यानंतर उपाययोजनांची मागणी करायची आणि प्रशासनाने नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केल्यानंतर त्याला विरोध करायचा, हा दुटप्पीपणा आहे. नवीन प्रकल्पही नको आणि मोशीतील कचऱ्याचे डोंगरही नको, तर शहरातील कचरा नेमका कुठे टाकायचा? सुलभा उबाळे यांनी याचे स्पष्ट उत्तर द्यावे.”
– अर्चना सस्ते, ई-प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका, भारतीय जनता पार्टी.





