ताज्या घडामोडीपुणे

एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयांध्ये राष्ट्रीय हॅकेथॉन उत्साहात; ७६ महाविद्यालयांच्या ५२७ विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्याल आळंदी (देवाची) येथे ११ व १२ सप्टेंबर २०२६ रोजी “कुरुक्षेत्र २.० – हॅकफेस्ट” हा राष्ट्रीय स्तरावरील २४ तासांचा हॅकेथॉन उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन्स इनोवेशन कौन्सिल (आयआयसी) अंतर्गत कार्यरत असलेल्या मोझिला एमआयटीएसीएससी क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत १५० संघांतील एकूण ५२७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व राजस्थान या पाच राज्यांतील ७६ महाविद्यालयांतून विद्यार्थी सहभागी झाले होते. आयआयटी मद्रासच्या संघानेही स्पर्धेत सहभाग घेतला. एकट्या पुणे जिल्ह्यातून ११८ संघ सहभागी झाले, तर हैदराबाद, बेंगळुरू, म्हैसूर, चेन्नई, तिरुचिरापल्ली, नांदेड, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नागपूर, सोलापूर व सीकर येथूनही संघ दाखल झाले होते. ही स्पर्धा तीन विषयगटांमध्ये घेण्यात आली – कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग (एजंटिक एआय व डेटा सायन्ससह), सायबर सुरक्षा व ब्लॉकचेन, आणि ओपन इनोव्हेशन. विद्यार्थ्यांनी सलग २४ तास काम करून प्रत्यक्ष समस्यांवर आधारित सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केल्या. प्रत्येक विषयगटातील तीन विजेत्या संघांना मिळून एकूण एक लाख रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात आली. “थिंक इट, बिल्ड इट, ब्रेक इट, फिक्स इट” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचार, सांघिक काम व समस्या सोडवण्याची वृत्ती वाढीस लागावी, हा उद्देश होता. कुरुक्षेत्र २.०” या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक (टायटल स्पॉन्सर) कोड शेफ हे होते. संस्कृती ज्वेलर्स, ब्रू अँड बझ कॅफे, जिसा सॉफ्टेक, ॲमकॅट व क्रिएटिव्ह क्रोज यांनी प्रायोजकत्वाच्या माध्यमातून सहकार्य केले. आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील २० परीक्षकांच्या मान्यवर पॅनेलने स्पर्धेचे परीक्षण केले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणातील यश काही मोजक्या व्यक्तींच्या प्रयत्नांतून कधीच साध्य होत नाही. उपसंचालक, अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या परिश्रमामुळेच ५२७ पाहुण्यांची चोवीस तास उत्तम व्यवस्था राखली गेली, असे सांगून त्यांनी या सर्वांच्या कामाचे कौतुक केले. तसेच डॉ. सुनील कराड यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनाबद्दल व पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी, आयआयसीचे उपाध्यक्ष श्री. अभिजित नेटके व आय आय सी संयोजक डॉ. संदीप ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कविता महाजन यांनी शिक्षक समन्वयक, तर प्रा. सोनाली वाळसे यांनी शिक्षक सहसमन्वयक म्हणून कार्यक्रमाचे समन्वयन केले. विद्यार्थी समन्वयक म्हणून श्रुतिका उमेश सागरशेट्टी (तृतीय वर्ष बी.एस्सी. डेटा सायन्स) यांनी, तर सहसमन्वयक म्हणून जयदीप बडे व वैष्णवी मुंडे यांनी काम पाहिले. विजेत्या संघाचे नावे

हेही वाचा –  सणासुदीत भेसळखोरांवर FDAची धडक; पुणे जिल्ह्यात १,६८३ किलो संशयित दुग्धजन्य साठा जप्त

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग व डेटा सायन्स या विषयगटात डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथील ‘कोड एपेक्स’ (श्रावणी सूर्यवंशी, सार्थक कापडणे, पायल किंगे, तनिषा शेलार) या संघाने प्रथम क्रमांक व १५,००० रुपयांचे बक्षीस पटकावले. मुंबईच्या डी. जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘चारकोल’ संघाने (आर्यन रेड्डी, दानिश जैन, अनिकेत नायर, झेन नाझरेथ) द्वितीय क्रमांक (१०,००० रु.)पटकावला, तर हैदराबादच्या सीएमआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या ‘टेक्नो वेव्ह’ संघाने (परमीत कौर, व्ही. एस. पी. श्री हर्षा, तनिष्क कंदुला) तृतीय क्रमांक (७,००० रु.) मिळवला.

सायबर सुरक्षा व ब्लॉकचेन या विषय गटात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या इशांत मेहरा याने एकट्याने सहभागी होत ‘ऑर्बिओनिक्स’ या नावाने प्रथम क्रमांक व १५,००० रुपयांचे बक्षीस पटकावले. नांदेडच्या ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसच्या ‘टीम समय’ संघाने (समय पोवडे, ऋतुजा जाधव, पूनम कुऱ्हे, गायत्री हिप्पळे) द्वितीय क्रमांक (१०,००० रु.) पटकावला, तर आंबी येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ‘पॅराडॉक्स’ संघाने (हिमांशु आयरे, केदार गायकवाड, वेदांत चव्हाण) तृतीय क्रमांक (७,००० रु.) मिळवला. ओपन इनोव्हेशन या विषयगटात पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या ‘गोल्डमायनर्स’ संघाने (संकेत महाजन, ओंकार साठे, पृथ्वीराज गनहाणे, साक्षी खुटवड) प्रथम क्रमांक व १५,००० रुपयांचे बक्षीस पटकावले. ओतूर येथील शरदचंद्र पवार कॉलेजच्या ‘झिरोबाइट्स’ संघाने (समर्थ राजेंद्र जाधव, केशव पसारे, श्रेयश कुलकर्णी, अमर माने) द्वितीय क्रमांक (१०,००० रु.) पटकावला, तर कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘टीन टायटन्स’ संघाने (सिद्धेश पवार, अंतरा केणे, यश शिंदे, अवंती कदम) तृतीय क्रमांक (७,००० रु.) मिळाला. दरम्यान, पुढील “कुरुक्षेत्र ३.०” स्पर्धेचे आयोजन सन २०२७ मध्ये करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाने जाहीर केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button