सणासुदीत भेसळखोरांवर FDAची धडक; पुणे जिल्ह्यात १,६८३ किलो संशयित दुग्धजन्य साठा जप्त
दौंड-मंचरमध्ये बटर, मिल्क पावडर, खवा, पनीर आणि तुपावर कारवाई; मार्केट यार्डातील आस्थापनाचा परवाना रद्द

पुणे : उत्सवाच्या काळात खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर संशयित व निकृष्ट दर्जाचा दुग्धजन्य साठा जप्त करण्यात आला आहे. दौंड आणि मंचर परिसरातील दोन स्वतंत्र आस्थापनांवर छापे टाकून एकूण सुमारे १ हजार ६८३ किलो दुग्धजन्य पदार्थ ताब्यात घेण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाने ११ सप्टेंबर रोजी पाटस (ता. दौंड) येथील एका आस्थापनावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे ८ लाख ५० हजार ७०२ रुपये किमतीचा १,५१९ किलो साठा जप्त करण्यात आला. यामध्ये म्हशीचे बटर आणि स्किम्ड मिल्क पावडरचा समावेश आहे. वेष्टनावरील माहितीमध्ये त्रुटी आढळल्याने तसेच या साठ्यात भेसळीचा संशय असल्याने प्रशासनाने तो ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी मंचर (ता. आंबेगाव) येथे दुसरी कारवाई करण्यात आली. या आस्थापनातून १३ हजार ७२० रुपये किमतीचा ४९ किलो खवा, ३१ हजार २०० रुपये किमतीचे १०४ किलो पनीर आणि ७ हजार ९२० रुपये किमतीचे ११ किलो तूप, असा एकूण १६४ किलो दुग्धजन्य साठा जप्त करण्यात आला. हा साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी तो ताब्यात घेत संबंधित आस्थापनाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा – “फडणवीस-शिंदेंनाच का टार्गेट करताय?”; मनोज जरांगेंना आशिष शेलारांचा थेट सवाल
दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या दुकानात मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले. तसेच अन्नसुरक्षेशी संबंधित विविध नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित आस्थापनाचा परवाना रद्द केला आहे.
उत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी FDAकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच भेसळयुक्त किंवा संशयित खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.





