श्रीचक्रधर स्वामींच्या मानवतावादी विचारांचा अंगीकार करा; मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
अंधश्रद्धा, विषमता आणि जातीभेदाविरोधात स्वामींचा संदेश; सामाजिक समरसता, स्त्री-पुरुष समानता आणि नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन

मुंबई : महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. त्यांच्या जीवनातून मिळणारे मानवतावादी आणि सामाजिक समरसतेचे विचार अंगीकारण्याचे आवाहन लोढा यांनी केले.
श्रीचक्रधर स्वामी यांनी तत्कालीन समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा, विषमता, कर्मकांड आणि जातीभेदाला विरोध करून मानवतेवर आधारित विचारांचा प्रसार केला. स्त्री-पुरुष समानता, सर्वांना शिक्षणाचा अधिकार, अहिंसा, दया, सत्य, परोपकार आणि सामाजिक समरसता यांचा संदेश त्यांनी दिला.
मानवाने सदाचार, विवेक आणि मानवकल्याणाचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश श्रीचक्रधर स्वामी यांच्या शिकवणीतून मिळतो, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. त्यांच्या विचारांची आजच्या काळातही सामाजिक जीवनासाठी उपयुक्तता असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘लीळाचरित्र’ महत्त्वाचा वारसा
श्रीचक्रधर स्वामींच्या कार्याचा महत्त्वपूर्ण वारसा म्हणून ‘लीळाचरित्र’ या मराठी भाषेतील आद्य चरित्रग्रंथाकडे पाहिले जाते. त्यांच्या अवतार दिनाचे औचित्य साधून समाजातील बंधुभाव, नैतिक मूल्ये आणि सामाजिक एकता अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही लोढा यांनी केले.
या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, प्रदीप कोपार्डे, दत्तात्रय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.





