बटाटे खाण्याची हेल्दी पद्धत; ‘हे’ ४ प्रकारचे पोटॅटो सॅलड नक्की ट्राय करा
पोटॅशियम, व्हिटॅमिन C आणि फायबरने समृद्ध; ग्रीक योगर्टपासून अॅव्होकॅडो आणि पेस्टोपर्यंत भन्नाट पर्याय

Health : बटाटा हा भारतीयांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. बटाट्याची भाजी, पुरी, पराठा किंवा फ्राईज अशा विविध प्रकारे बटाटा खाल्ला जातो. मात्र बटाट्याचा वापर केवळ तळलेल्या पदार्थांसाठी न करता, ताज्या भाज्या, प्रथिने आणि पौष्टिक घटकांसोबत पोटॅटो सॅलड तयार करता येते. बटाट्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन C आणि फायबर असते. त्यामुळे योग्य घटकांसोबत तयार केलेले सॅलड हे पोटभरीचे आणि पौष्टिक जेवण ठरू शकते.
१. ग्रीक योगर्ट पोटॅटो सॅलड
दुपारच्या जेवणासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. उकडलेले छोटे बटाटे, चिरलेली शेपूची पाने, ओवा, कांदा आणि थोडा लिंबाचा रस एकत्र करा. त्यावर ग्रीक योगर्ट घाला. ग्रीक योगर्टमुळे सॅलडमध्ये प्रथिने वाढतात, तसेच त्याला क्रीमी आणि किंचित आंबट-गोड चव मिळते.
२. ग्रिल्ड कॉर्न-अॅव्होकॅडो पोटॅटो सॅलड
हलके आणि पौष्टिक रात्रीचे जेवण हवे असल्यास हा पर्याय ट्राय करता येईल. बटाटे हलके भाजून त्यात भाजलेले मक्याचे दाणे, अॅव्होकॅडो, चेरी टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर घाला. त्यावर लाईम व्हिनेग्रेट टाका. अॅव्होकॅडोमधून आरोग्यदायी फॅट्स मिळतात, तर भाजलेल्या मक्यामुळे सॅलडला खास स्मोकी चव येते.
हेही वाचा – ‘मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सपोर्ट का करत नाही?’; मराठा तरुणाचा ओमराजे निंबाळकरांना फोन
३. मेक्सिकन-स्टाइल पोटॅटो सॅलड
तिखट आणि मसालेदार पदार्थ आवडत असतील तर हा प्रकार नक्की आवडेल. उकडलेले बटाटे, काळे बीन्स, मका, ढोबळी मिरची, हिरव्या मिरच्या आणि चेडर चीज एकत्र करा. त्यावर लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑईल, पॅप्रिका आणि जिऱ्याची पूड घाला. या सॅलडमध्ये बटाट्यासोबत बीन्समुळे प्रथिनांचाही समावेश होतो.
४. पेस्टो पोटॅटो सॅलड
तुळशीच्या पानांचा सुगंध आणि बटाट्याची चव आवडत असेल तर पेस्टो पोटॅटो सॅलड उत्तम पर्याय आहे. छोटे बटाटे, हलके वाफवलेले बीन्स, पाइन नट्स, पार्मेझान चीज आणि ताज्या तुळशीच्या पेस्टो सॉसमध्ये एकत्र करा. रंगीबेरंगी भाज्या आणि पेस्टोमुळे हे सॅलड दिसायला आकर्षक तर लागतेच, शिवाय चवीलाही उत्तम ठरते.
बटाटा खाण्याची पद्धत महत्त्वाची
बटाटा स्वतःहून ‘अनहेल्दी’ नसतो; मात्र त्याची तयारी कशी केली जाते, यावर पदार्थाचे एकूण पोषणमूल्य अवलंबून असते. तळण्याऐवजी उकडलेले किंवा हलके भाजलेले बटाटे वापरून, त्यासोबत भाज्या, डाळी किंवा योगर्टसारखे घटक जोडल्यास अधिक संतुलित पर्याय तयार करता येतो. आहारातील गरजा, आरोग्यस्थिती आणि एकूण आहार लक्षात घेऊन प्रमाण ठरवणे महत्त्वाचे आहे.




