TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘लोकसेवा प्रसिद्धीचे माध्यम नव्हे, जबाबदारी’; तुकाराम मुंढेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

FDA आयुक्तांच्या पोस्टमधून सुशासनाचा अर्थ स्पष्ट; ‘प्रसिद्धीपेक्षा जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास महत्त्वाचा’

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे चर्चेत असलेले ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सोशल मीडिया पोस्टची सध्या चर्चा होत आहे. ‘लोकसेवा ही प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम नसून ती एक जबाबदारी आहे,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनातील मूलभूत तत्त्व अधोरेखित केले आहे.

तुकाराम मुंढे यांच्या विविध कारवाया आणि कामकाजाची सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होत असते. त्यांच्या सोशल मीडिया लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘X’ या प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमधून प्रसिद्धीपेक्षा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास अधिक महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

सुशासनाचा निकष प्रसिद्धी नव्हे

तुकाराम मुंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये लोकसेवेचा उद्देश प्रसिद्धी मिळवणे नसून कर्तव्य आणि जबाबदारीची वचनबद्धता असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया किंवा प्रसिद्धीमुळे एखाद्या कामाकडे नागरिकांचे लक्ष वेधले जाऊ शकते; मात्र त्यावरून चांगल्या प्रशासनाचे मूल्यांकन करता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिक स्वतःला किती सुरक्षित समजतात, प्रशासकीय संस्था किती उत्तरदायी आहेत आणि कठीण प्रसंगी व्यवस्था योग्य पद्धतीने आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास नागरिकांना वाटतो का, यावरूनच सुशासनाचे खरे मूल्य ठरते, असे मुंढे यांनी नमूद केले.

हेही वाचा –  अंगणवाडी सेविका-मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक; मंत्री आदिती तटकरे

अधिकारी बदलतात, संस्था कायम राहतात

अधिकारी येतात आणि जातात; मात्र जनतेचा विश्वास संपादन करणारी मजबूत संस्थात्मक व्यवस्था कायम टिकली पाहिजे, असा संदेशही त्यांनी दिला आहे.

‘माझ्यासाठी प्रशासनाचा अंतिम उद्देश व्यक्तिकेंद्रित नसून संस्था मजबूत करणे आणि जनहित जपणे हा आहे. अधिकारी बदलतात, पण विश्वासार्ह संस्था नेहमी कायम राहिल्या पाहिजेत,’ असे तुकाराम मुंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, FDA आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाची उत्पादने आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंढे यांच्या कार्यपद्धतीची चर्चा होत असतानाच त्यांच्या या पोस्टनेही लक्ष वेधून घेतले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button