‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास’; महाराष्ट्रात २०२६ ते २०२९ राज्यव्यापी मद्य-अंमली पदार्थ तपासणी अभियान
एसटीसह बस, टॅक्सी, कॅब, रिक्षा, ट्रक, शालेय वाहने आणि रुग्णवाहिकांचीही तपासणी; डिजिटल देखरेखीसह एकात्मिक यंत्रणा उभारणार

मुंबई : रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी महाराष्ट्रात ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी मद्य आणि अंमली पदार्थ तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. २०२६ ते २०२९ या कालावधीत विविध प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या अभियानाबाबत सविस्तर चर्चा झाली. नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्यासोबतच जनजागृती, नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार आणि पुनर्वसन यांचा समन्वय साधला जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटी चालक-वाहकांचीही तपासणी
‘नशामुक्त एसटी’ अभियानाच्या माध्यमातून चालक आणि वाहकांच्या ड्रग सेवन तपासणीसाठी १ लाख रुपयांची देणगी देऊन तपासणी मशीन खरेदी करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले.
या अभियानात एसटी महामंडळासोबतच महानगरपालिका बससेवा, शासकीय वाहने, सार्वजनिक उपक्रम आणि कंत्राटी वाहनांचा समावेश केला जाणार आहे. खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, ॲपआधारित कॅब, ऑटोरिक्षा आणि कंत्राटी प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था लागू करण्याचे नियोजन आहे.
ट्रकपासून शालेय वाहनांपर्यंत तपासणी
औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी वाहतूक सेवांबरोबरच ट्रक, टँकर, धोकादायक मालवाहतूक, गोदामे, वितरण केंद्रे आणि बंदरांशी संबंधित वाहतूक सेवांचाही या यंत्रणेत विचार केला जाणार आहे. शाळा-महाविद्यालयीन वाहने, रुग्णालयांची वाहने आणि रुग्णवाहिकांसाठी त्यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन स्वतंत्र तरतुदी करण्यात येणार आहेत.
वाहतुकीचा प्रकार आणि जोखीम लक्षात घेऊन कर्तव्यपूर्व मद्य तपासणी, नियोजित तसेच आकस्मिक अंमली पदार्थ तपासणी केली जाणार आहे. विशिष्ट घटना किंवा वाजवी संशयाच्या परिस्थितीतही तपासणी करता येईल. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, प्रमाणित उपकरणे आणि डिजिटल नोंदव्यवस्था विकसित केली जाणार आहे.
हेही वाचा – UCMAS गणित स्पर्धेत पिंपरीतील अर्पिता छाजेडचे उज्ज्वल यश; राष्ट्रीय स्तरावर पटकावला ५ वा क्रमांक
अंमली पदार्थ तपासणीसाठी विशेष किट
अंमली पदार्थांची प्राथमिक स्तरावर तात्काळ तपासणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या विशेष तपासणी किटच्या चाचण्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. या किटचा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाणार आहे.
या माध्यमातून संशयित पदार्थांची प्राथमिक छाननी करता येणार असून, पदार्थाचे पॅकेट उघडण्याची गरज नसल्याने थेट हाताळणीचा धोका कमी होणार आहे. प्राथमिक तपासणीनंतर आवश्यकतेनुसार विहित पद्धतीने पुष्टीकरण आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
व्यसनमुक्तीसाठी उपचार आणि पुनर्वसन
नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविणाऱ्या चालकांबाबत शासनाची भूमिका कठोर राहणार असली, तरी व्यसनमुक्तीसाठी मदतीची गरज असलेल्या चालकांना समुपदेशन, उपचार, पुनर्वसन आणि वैद्यकीय मूल्यमापनाची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
तपासणीमध्ये सुरक्षिततेला धोका आढळल्यास संबंधित चालकाला तात्पुरते वाहन चालविण्याच्या कर्तव्यापासून दूर करून पर्यायी चालकाची व्यवस्था करण्याची कार्यपद्धती तयार केली जाणार आहे. चालकांच्या तपासणीशी संबंधित वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचेही संरक्षण केले जाणार आहे.
वाहनमालकांचीही जबाबदारी
सुरक्षित चालक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केवळ चालकाची नसून वाहनमालक, वाहतूक कंपन्या, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि कंत्राटदारांचीही असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित नियम आणि सेवा करारांमध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत.
परिवहन, गृह, उद्योग, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय आणि शिक्षण विभागांच्या समन्वयातून राज्यस्तरीय नियोजन, जिल्हास्तरीय अंमलबजावणी आणि संस्थास्तरीय उत्तरदायित्वाची यंत्रणा विकसित केली जाणार आहे.
डिजिटल देखरेखीसह अंमलबजावणी
२०२६ ते २०२९ या कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. डिजिटल देखरेख व्यवस्थेद्वारे तपासण्यांचे प्रमाण, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, उपकरणांची कार्यक्षमता, वैद्यकीय संदर्भ आणि संबंधित संस्थांचे अनुपालन यांचा नियमित आढावा घेतला जाईल.
“नशामुक्त चालक म्हणजे सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. प्रत्येक चालकाची जबाबदारी, प्रत्येक प्रवाशाची सुरक्षितता आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास जपणे ही शासनाची सामूहिक जबाबदारी आहे,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.




