Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ॲपआधारित टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षेचे कवच; ‘ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी

चालकांची तीन महिन्यांत माहिती सादर करण्याचे कंपन्यांना निर्देश; पात्र चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व

मुंबई : ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती तीन महिन्यांत परिवहन विभागाकडे सादर करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. चालकांची ओळख, वास्तव्य आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व देण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’च्या अंमलबजावणीबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, परिवहन विभागाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चालकांना सामाजिक सुरक्षेचा लाभ

ॲपआधारित टॅक्सी सेवेत कार्यरत चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. चालकांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे.

हेही वाचा –  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थांचा ऐतिहासिक वारसा जपा; जतन-संवर्धनाची कामे दर्जेदार करा : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ॲपआधारित टॅक्सी चालकांची ओळख, वास्तव्य आणि कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यासाठी चालकांना डोमिसाइल प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

चालकांना व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहणार असून, पात्र चालकांना परिवहन विभागाकडून बॅज देण्यात येणार आहे. पात्र चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व देऊन त्यांच्या कुटुंबीयांनाही मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

कागदपत्रांची काटेकोर पडताळणी

ॲग्रीगेटर धोरणानुसार चालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने सुनिश्चित करावी, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या. अपघात तसेच गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांचे अर्ज, ओळखपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तीन महिन्यांत माहिती सादर करावी

संबंधित ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती संकलित करून परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत चालकांची माहिती, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रक्रियेमुळे ॲपआधारित टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यासोबतच प्रवाशांची सुरक्षितता आणि सेवा व्यवस्थेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button