ISRO ची जागतिक भरारी; भारताच्या अंतराळ मोहिमांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
‘इस्रोचे तंत्रज्ञान संपूर्ण जगासाठी उपयुक्त’; २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक, २०४० पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इस्रोने आपल्या उत्कृष्ट कामगिरीसह किफायतशीर अंतराळ मोहिमांमुळे जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. इस्रोचे तंत्रज्ञान आणि विविध देशांसोबतची भागीदारी केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
पॅरिस येथे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या योगदानाचे कौतुक केले. इस्रोच्या उत्पादन आणि ऑपरेशनल कामांचे खासगी संस्थांकडे हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावावरून कर्मचारी संघटनांनी चिंता व्यक्त केल्यानंतर पंतप्रधानांचे हे वक्तव्य समोर आले आहे.
‘इस्रोची क्षमता देशासाठीच नव्हे, जगासाठी उपयुक्त’
इस्रोच्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकरी, मच्छिमार, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि नेव्हिगेशन यांसारख्या विविध क्षेत्रांत होत असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारतीय रॉकेटद्वारे आतापर्यंत ३४ देशांचे ४३० हून अधिक उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले आहेत. भारतीय अंतराळ कार्यक्रमावर जगाने दाखवलेला विश्वास हा अनेक पिढ्यांच्या शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनेक दशकांच्या मेहनतीतून प्रत्येक मोहिमेच्या यशासोबत इस्रोने जागतिक प्रतिष्ठा निर्माण केली असून, अंतराळ संशोधन करणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताला अभिमानास्पद स्थान मिळवून दिले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
हेही वाचा – उसाच्या उपलब्धतेच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांना शंका; फेरआढावा घेऊन वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करण्याचे आदेश
चांद्रयान-३च्या यशाचा उल्लेख
भारताच्या अंतराळ मोहिमांचा उल्लेख करताना मोदी यांनी चांद्रयान-३ आणि आदित्य-एल१ मोहिमेचा विशेष उल्लेख केला. चांद्रयान-३च्या यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरल्याचे त्यांनी सांगितले. तर आदित्य-एल१ मोहिमेतून सूर्याचा अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भविष्यातील उद्दिष्टांबाबत बोलताना २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारणे आणि २०४० पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवणे, हे भारताचे लक्ष्य असल्याचे मोदी यांनी सांगितले.
‘अंतराळ तंत्रज्ञानाचा फायदा संपूर्ण मानवजातीला’
भारताच्या अंतराळ कार्यक्रमामागील मार्गदर्शक तत्त्व स्पष्ट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अंतराळ तंत्रज्ञान आणि संशोधनातून मिळणारे फायदे केवळ भारतापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, इस्रोसोबतच भारताचे खासगी अंतराळ क्षेत्रही वेगाने प्रगती करत असल्याचे मोदी यांनी सांगितले. उद्योजकतेची ऊर्जा इस्रोच्या उत्कृष्टतेशी जोडली जात असून, यामुळे भारताच्या अंतराळ क्षेत्राला भविष्यात आणखी मोठी झेप घेण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.





