Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील बालकांसाठी विशेष अभियान; १,५९३ लाभार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ

१९ जिल्ह्यांतील पात्र बालकांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ आणि केंद्राच्या स्पॉन्सरशिप योजनेचा लाभ; उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लाभ देण्याचे आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई : शेतकरी आत्महत्याग्रस्त १९ जिल्ह्यांतील पात्र १ हजार ५९३ लाभार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा, तर १३३ बालकांना केंद्र शासनाच्या स्पॉन्सरशिप योजनेचा लाभ देण्यात येत आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये विशेष अभियान राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील बालकांसाठी योजना

विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना सक्षम करण्यासोबतच त्यांच्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, उपसचिव आनंद बोंडवे, उपायुक्त जे. बी. गिरासे, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बालकाला कुटुंबापासून दूर जाऊ न देणे हा उद्देश

आर्थिक, सामाजिक किंवा अन्य प्रतिकूल परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाला कुटुंबापासून वेगळे होऊन बालगृहात जावे लागू नये आणि त्याचे संगोपन कुटुंबातच व्हावे, हा बालसंगोपन योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत बालकाला प्रत्यक्ष परिपोषण अनुदान म्हणून दरमहा २ हजार ५५० रुपये दिले जातात. राज्यभरातील सुमारे १ लाख ६० हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल; ‘प्रगती’ प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

पात्र बालकांसाठी जिल्हानिहाय विशेष अभियान

जास्तीत जास्त पात्र बालकांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित जिल्ह्यांनी विशेष अभियान राबवून प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांचा एकल महिला धोरणात समावेश करण्यात येणार असून, त्यांना एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा

या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असून, संबंधित विभागांनी समन्वयाने विशेष अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button