दिल्ली दुर्घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद; ५ मजली इमारत कोसळून ६ ठार, १० गंभीर जखमी

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एका खासगी वसतिगृहाची (पीजी) पाच मजली इमारत अचानक कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. धौला कुआन परिसरातील श्री व्यंकटेश्वर कॉलेजसमोर ही इमारत असून, तिथे विद्यार्थी आणि इतर नागरिक पेइंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होते. ही संपूर्ण इमारत काही सेकंदांत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळल्याचा अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नानकपुरा गुरुद्वाराजवळ दुपारी १:३४ च्या सुमारास इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांसह एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या ११ जणांना तातडीने एम्सच्या जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच जणांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी सात जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा
सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी; चीन मास्टर्सचं जेतेपद पटकावलं!
सीसीटीव्हीमध्ये थरार कैद
दुर्घटना घडतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण इमारत जमिनीवर कोसळल्याचे दिसत आहे. इमारतीचा भाग अचानक खाली आल्यामुळे आतमध्ये आणि आसपास असलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. इमारतीच्या मलब्याखाली रस्त्यावर पार्क केलेली अनेक वाहने दबून चक्काचूर झाली आहेत. उशिरा रात्रीपर्यंत बचाव पथकांकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
तळघरातील खोदकाम संशयाच्या भोवऱ्यात
ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचे (रिनोव्हेशन) काम सुरू होते. तसेच तळघरात अनधिकृतपणे खोदकाम केले जात असल्याचा संशय व्यक्त होत असून, यामुळेच इमारतीचा पाया कमकुवत होऊन ही मोठी दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.





