केरळमध्ये भीषण अपघात: उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; ८ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Kerala Thrissur Road Accident | केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-६६ वर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात आठ तरुण विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. भरधाव कारने रस्ता दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा थरारक अपघात घडला. मृत पावलेले सर्व विद्यार्थी तमिळनाडूचे रहिवासी होते. ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री ११:४० च्या सुमारास कैपमंगलम परिसरात घडली.
तमिळनाडू पासिंग असलेली ही कार गुरुवायूरहून कोडुंगलूरच्या दिशेने वेगाने जात होती. राष्ट्रीय महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यावरील वाहतूक एका डायव्हर्शनजवळून वळवण्यात आली होती. याच ठिकाणी एक ट्रक उभा होता. कारचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट उभ्या ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की अपघातानंतर हवेत धूर आणि धुळीचे लोट पसरले, ज्याचे विदारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
हेही वाचा
आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
कारचा चक्काचूर; पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले
धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारचा पत्रा कटरच्या साहाय्याने कापून आतील विद्यार्थ्यांना बाहेर काढावे लागले. मात्र, बचाव पथक पोहोचण्यापूर्वीच सर्व आठही जणांचा श्वास थांबला होता.
इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुण तमिळनाडूतील दिंडीगुल येथील पीएसएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते. शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवगृहात पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महामार्गावर कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा संकेत आणि फलक लावले होते की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत.





