लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. आगामी निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी असलेले भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी दोन दिवसांचा लखनौ दौरा आखला आहे. उत्तर प्रदेशचे प्रभारी झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने त्याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
या दौऱ्यात विनोद तावडे जिल्हा स्तरावरील नेत्यांसोबत बैठका घेणार असून, बूथ पातळीवरील तयारी आणि आगामी संघटनात्मक कार्यक्रमांचा आढावा घेणार आहेत. बूथपासून संघटनेच्या विविध स्तरांपर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांचा भर असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्यावर तावडे यांनी लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची स्थिती, सक्रिय कार्यकर्त्यांना योग्य दिशा देणे आणि पक्षाच्या संघटनात्मक कामाला गती देणे यावर ते भर देणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – दहीहंडीच्या उत्सवात दुर्घटना; डीजेचा रॅक अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
बॅनरबाजी, शक्तिप्रदर्शन टाळण्याच्या सूचना
विनोद तावडे यांनी आपल्या उत्तर प्रदेश दौऱ्याच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी किंवा गर्दी न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बॅनर लावल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो आणि वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होतो. त्यामुळे स्वागत आणि शक्तिप्रदर्शनावर खर्च करण्याऐवजी पक्षाच्या प्रत्यक्ष संघटनात्मक कामाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ग्राउंड लेव्हलवर पक्षाची पकड मजबूत करण्यावर तावडे यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. बूथ पातळीवरील संघटन, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे.
दरम्यान, विनोद तावडे यांच्याकडे भाजपमधील अनुभवी आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून पाहिले जाते. यापूर्वी त्यांच्याकडे बिहारची राजकीय जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जातीय समीकरणे, विविध सामाजिक घटकांमधील संतुलन आणि पक्षाच्या पारंपरिक मतदारांबरोबरच इतर सामाजिक गटांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान तावडेंसमोर असणार आहे. त्यामुळे त्यांच्या लखनौ दौऱ्यातील बैठका आणि संघटनात्मक आढावा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.




