Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चैत्यभूमी ते इंदूमिल रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग; ६ डिसेंबरला उद्घाटनाचे नियोजन

रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याचे निर्देश; महसूल विभाग, एमएमआरडीए आणि महापालिकेने समन्वयाने काम करण्याच्या अण्णा बनसोडेंच्या सूचना

मुंबई : दादर येथील चैत्यभूमीपासून इंदूमिलपर्यंत जाणाऱ्या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे, तसेच आवश्यक जागेच्या हस्तांतरणासाठी महसूल विभाग आणि एमएमआरडीएकडून अभिप्राय तातडीने मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अण्णा बनसोडे यांनी अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मुख्य स्तूप या विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ६ डिसेंबर रोजी या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश बनसोडे यांनी दिले.

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचे प्रस्ताव ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने पाठवावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जागेच्या हस्तांतरणासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  दुकानदारांच्या री-केवायसीसाठी १५ सप्टेंबरची मुदत वाढणार? UPI पेमेंटवर परिणामाची शक्यता

लाखो अनुयायांना होणार फायदा

सध्याच्या रस्त्याच्या समुद्राकडील बाजूची जमीन मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करून रस्ता रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे. चैत्यभूमीला जी/उत्तर विभागातील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाशी जोडल्यास लाखो अनुयायांना त्याचा फायदा होणार आहे.

इंदूमिलपर्यंत रस्ता तयार करण्यासोबतच रस्त्यालगतच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे या मार्गाच्या विकासामुळे वाहतूक आणि अनुयायांच्या सोयीमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

संबंधित विभागांना समन्वयाच्या सूचना

महसूल विभाग, पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका प्रशासन आणि एमएमआरडीएने रस्त्याच्या उभारणीसाठी सकारात्मक आणि गतिमान कार्यवाही करावी, असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले. कामाच्या प्रगतीचा पुढील आढावा येत्या महिन्यात संबंधित विभागांकडून घेतला जाणार आहे.

या बैठकीला मुंबई महापालिका, एमएमआरडीए, महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच चैत्यभूमी व्यवस्थापक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button