भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा महिनाभरात अहवाल द्या; आशिष शेलारांचे निर्देश
अवैध उत्खनन आणि बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय; २०११च्या राज्य संरक्षित स्मारक अधिसूचनेबाबतही कार्यवाहीला वेग

मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ज्या भूमीत तपश्चर्या केली, त्या देहूजवळील भंडारा-भामचंद्र गड परिसराच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.
भंडारा आणि भामचंद्र डोंगर परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावा, तसेच या भागात सुरू असलेले अवैध उत्खनन आणि बांधकामे कायमस्वरूपी थांबवावीत, अशी मागणी तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीने मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीला तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांच्यासह समितीचे सदस्य, संबंधित जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, पोलीस, एमआयडीसी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
२०११च्या अधिसूचनेबाबत कार्यवाही
बैठकीत पुरातत्व विभागाने भंडारा-भामचंद्र गडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासंदर्भात २०११ मध्ये अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर २०१७ मध्ये काही बदल सुचवून हा प्रस्ताव विधि व न्याय विभागाने परत पाठविला होता.
यानुसार पुरातत्व विभागाने २०२५ मध्ये आवश्यक सुधारणा करून नवीन प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे सादर केल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा – चैत्यभूमी ते इंदूमिल रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग; ६ डिसेंबरला उद्घाटनाचे नियोजन
अवैध उत्खननावर संयुक्त समिती
भंडारा-भामचंद्र गड परिसरातील उत्खननाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीही आपली भूमिका मांडली. उत्खननाबाबत संयुक्त समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या परिसराशी राज्य शासनाच्या विविध विभागांचा संबंध येत असल्याने कोणताही निर्णय घेताना सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.
महिनाभरात सद्यस्थिती अहवाल
मुख्य सचिवांनी सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून भंडारा-भामचंद्र गड परिसराचा सर्वंकष अभ्यास करावा आणि एका महिन्याच्या आत सद्यस्थिती अहवाल सादर करावा, असे निर्देश आशिष शेलार यांनी दिले.
या संपूर्ण कार्यवाहीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधावा, असेही शेलार यांनी सांगितले. त्यामुळे भंडारा-भामचंद्र गडाच्या संरक्षणासंदर्भातील पुढील कार्यवाहीला आता वेग येण्याची शक्यता आहे.





