‘सीजेपी’च्या आंदोलनात मारहाणप्रकरणी स्वतंत्र भारद्वाजला अटक

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलकावर हल्ला केल्याची पॉडकास्टमध्ये उघड कबुली देणाऱ्या उजव्या विचारसरणीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी शनिवारी त्याला औपचारिकरीत्या अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भारद्वाजला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जून महिन्यात जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना निशू आझाद या विद्यार्थिनीचे वडील संजय कुमार यांच्या डोक्यावर लोखंडी कड्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी भारद्वाजची एका पॉडकास्टमधील धक्कादायक मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. “मी एका व्यक्तीचे डोके फोडले, तरीही कलम ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यांत मला तुरुंगात जावे लागले नाही,” अशी दर्पोक्ती त्याने केली होती. हा व्हिडिओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी शेअर केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
हेही वाचा
बलुचिस्तानात रक्ताचा सडा! BLAच्या दोन मोठ्या हल्ल्यांत पाकिस्तानी लष्कराचे २५ जवान ठार
या कबुलीजबाबाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सीजेपीचे कार्यकर्ते, खासदार चंद्रशेखर आझाद, खासदार पप्पू यादव तसेच काँग्रेसच्या विधी पथकाने संसद मार्ग पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या दिला होता. आरोपीवर हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी लावून धरण्यात आली होती. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.
‘स्वसंरक्षणासाठी हल्ला केल्याचा’ आरोपीचा दावा:
वाद वाढल्यानंतर भारद्वाजने स्पष्टीकरण देत मॉब लिंचिंगच्या भीतीने आपण केवळ स्वसंरक्षणासाठी (आत्मरक्षणार्थ) हल्ला केल्याचा दावा केला होता. मात्र, सार्वजनिक मंचावर हिंसेची उघड कबुली देणे आणि कायद्याला आव्हान देणारी भाषा वापरणे त्याला महागात पडले असून, पोलीस आता त्याची सखोल चौकशी करत आहेत.





