“१२ तारखेनंतर गंभीर परिणाम होतील”; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा
५८ लाख कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्रे व हैदराबाद गॅझेटनुसार वैधता देण्यास विलंबाचा आरोप; “संघर्ष हवा असेल तर मराठा समाज तयार”

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ५८ लाख कुणबी नोंदी उपलब्ध असल्याचा दावा करत, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे तसेच हैदराबाद गॅझेटनुसार वैधता मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संभाजीनगर, गंगापूर, गौर, परभणी आणि बीड येथील प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या घटनांचाही त्यांनी उल्लेख केला.
“सरकार मराठा समाजाची हेळसांड करत आहे आणि आम्हाला हिणवत आहे,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच १२ तारखेनंतर गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
‘सरकारला संघर्ष करायचा असेल तर मराठा समाज तयार’
सरकारच्या कथित भूमिकेमुळे मराठा समाजात तीव्र रोष निर्माण झाला असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारला संघर्ष करायचा असेल तर मराठा समाज त्यासाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईपर्यंत आंदोलन नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांना त्रास देणार नसल्याचे सांगतानाच, बॅरिकेड्स हटवणार, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हेही वाचा – KBC 18 : अमिताभ बच्चन यांच्या समोर अक्षय कुमारच्या पर्सला लागली आग; सैफ अली खानही झाला थक्क
फडणवीस आणि शिंदेंवरही निशाणा
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. त्यांच्या धोरणांमुळेच मराठा समाजात चीड निर्माण झाली असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता या वक्तव्यामुळे निर्माण झाली आहे.





