भंगार आणि नियमबाह्य रिक्षांवर परिवहन विभागाचा कडक बडगा; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम
प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या रिक्षांची राज्यभर तपासणी; दोषी वाहनांवर कठोर प्रशासकीय कारवाईचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील भंगार (स्क्रॅप) म्हणून घोषित झालेल्या तसेच नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा रिक्षांवर ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन विभागाला दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या रिक्षा कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भंगार झालेल्या किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयात शुक्रवारी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव तसेच राज्यातील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भंगार रिक्षांचा पुन्हा वापर रोखणार
यावेळी प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांची सुरक्षितता ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले. धोकादायक किंवा नियमबाह्य वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही मुभा दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
भंगार म्हणून घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी तसेच इतर नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा – NCP: युवतींच्या सहभागासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ‘युवती जोडो अभियान २०२६’
५ ऑक्टोबरपर्यंत कारवाईचा अहवाल
विशेष तपासणीदरम्यान दोषी आढळणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासह आवश्यक ती कठोर प्रशासकीय पावले उचलण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले आहेत.
राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवावी आणि ५ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकृत आणि सुरक्षित रिक्षांनाच परवानगी
बैठकीत रिक्षा-टॅक्सी चालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. काही नियमबाह्य वाहनांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसायाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी केवळ अधिकृत आणि सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी असावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
परिवहन विभागाच्या या विशेष मोहिमेमुळे राज्यातील भंगार, बेकायदेशीर आणि नियमबाह्य रिक्षांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





