TOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

शताब्दी वर्षात मोहन भागवत यांचा लंडन दौरा; ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जगभर पोहोचवणार

२ ते ७ सप्टेंबरदरम्यान विविध धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद; ६ सप्टेंबरला ‘सेलिब्रेशन ऑफ ऑननेस’ कार्यक्रम

लंडन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षानिमित्त जगभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे २ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लंडन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विविध धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांशी ते संवाद साधत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये केली. राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी संघटित आणि मजबूत समाज आवश्यक असल्याच्या विचारातून संघाची स्थापना झाल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. गेल्या शंभर वर्षांत स्वयंसेवकांच्या माध्यमातून संघाने विविध सामाजिक क्षेत्रांत कामाचा विस्तार केला असल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे.

१.५२ लाखांहून अधिक सेवा प्रकल्प

आरएसएसच्या २०२५-२६च्या वार्षिक अहवालानुसार, शिक्षण, आरोग्यसेवा, सामाजिक कल्याण, स्वावलंबन यांसह विविध क्षेत्रांत देशभर १ लाख ५२ हजारांहून अधिक सेवा प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तसेच देशभरात १ लाख ३४ हजारांहून अधिक नियमित स्थानिक उपक्रम, दैनंदिन शाखा तसेच साप्ताहिक आणि मासिक बैठका आयोजित केल्या जात असल्याचे संघाने म्हटले आहे.

संघाच्या मते, त्याचे कार्य सामायिक सांस्कृतिक मूल्ये, विविधतेतील एकता आणि सामाजिक समरसतेवर आधारित आहे. शताब्दी वर्षानिमित्त संघाने सामाजिक समरसता, कुटुंबमूल्यांचे संवर्धन, पर्यावरणीय जबाबदारी, स्वावलंबन आणि नागरी कर्तव्यभावना हे पाच प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत.

परदेशातही सभ्यतामूलक संवादाला वेग

शताब्दी वर्षात जगभरातील विविध समुदाय आणि संस्थांशी संवाद वाढवण्यावर आरएसएसने भर दिला आहे. एप्रिल २०२६ मध्ये संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी युनायटेड किंगडम, अमेरिका आणि जर्मनीचा दौरा केला होता. या दौऱ्यात लंडनमधील चॅथम हाऊस, अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि हडसन इन्स्टिट्यूट तसेच बर्लिनमधील धोरणविषयक संस्थांमध्ये त्यांनी संवाद साधला.

त्यानंतर डॉ. मोहन भागवत यांनी न्यूयॉर्क आणि टोरांटो येथेही विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये आयोजित बहुधर्मीय परिषदेत त्यांनी सहभाग घेतला. या परिषदेला विविध धर्म आणि पंथांचे १७५ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित ‘युनिव्हर्सल ऑननेस’ परिषदेलाही त्यांनी संबोधित केले.

टोरांटो येथे CHORDच्या निमंत्रणावर आयोजित ‘हिंदू विश्वबंधु’ परिषदेलाही भागवत यांनी संबोधित केले. या कार्यक्रमात कॅनडातील सर्व दहा प्रांतांमधील १७५ संस्थांचे दोन हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

हेही वाचा –  NCP: युवतींच्या सहभागासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ‘युवती जोडो अभियान २०२६’

लंडनमध्ये विविध धर्मस्थळांना भेटी

डॉ. भागवत २ सप्टेंबर रोजी लंडनमध्ये दाखल झाले. त्यांच्या दौऱ्याचे समन्वयन ब्रिटनस्थित ‘इंटिग्रल’ या संस्थेने केले आहे. ब्रिटन आणि भारतातील समुदाय व नेतृत्व यांच्यात संवाद आणि सहकार्य वाढवण्यासाठी ही संस्था कार्यरत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ब्रिटनमधील ११५ हून अधिक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांनी डॉ. भागवत यांच्या स्वागतासाठी आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहकार्य केले आहे. दौऱ्यात त्यांनी विविध धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांशी भेटीगाठी घेतल्या आहेत.

आंतरधर्मीय संवादाच्या भाग म्हणून त्यांनी विल्स्डेन येथील श्री स्वामीनारायण मंदिर आणि खालसा जथा ब्रिटिश आयल्स गुरुद्वाराला भेट दिली आहे. लंडनमधील जैन मंदिरालाही भेट देण्याचे नियोजन असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे.

६ सप्टेंबरला ‘सेलिब्रेशन ऑफ ऑननेस’

६ सप्टेंबर रोजी ‘सेलिब्रेशन ऑफ ऑननेस’ या विषयावर समुदाय नेत्यांचा सत्कार आणि सभ्यतामूलक संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हिंदू स्वयंसेवक संघ यूकेच्या पुढाकाराने आणि ‘इंटिग्रल’च्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. ब्रिटनमधील ३१० हून अधिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडममधील या संवादमालिकेच्या माध्यमातून आरएसएसच्या निःस्वार्थ सेवा, सामाजिक समरसता आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संघाचे माध्यम व जनसंपर्क विभागाचे प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group