TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

चंद्रपूर काँग्रेसमध्ये पुन्हा अंतर्गत संघर्ष; वडेट्टीवार गटाकडून गटनेते सुरेंद्र अडबालेंना हटवण्याच्या हालचाली

धानोरकर गटातील तीन नगरसेवक वडेट्टीवार गटाच्या गोटात; संख्याबळ १४ विरुद्ध १३, गटनेता बदलाच्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक रंगण्याची शक्यता

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवे गटनेते सुरेंद्र अडबाले यांना पदावरून हटवण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाने हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर गटातील तीन नगरसेवक वडेट्टीवार गटाच्या गोटात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

महानंदा वाळके, विनोद लभाने आणि आकाश मानकर या तीन नगरसेवकांनी धानोरकर गटाला सोडचिठ्ठी देत वडेट्टीवार गटाची साथ घेतल्याचे समजते. बुधवारी रात्रीच या नगरसेवकांना चंद्रपूर शहराबाहेर हलविण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटांचे संख्याबळ बदलले असून, धानोरकर गटाकडे १३, तर वडेट्टीवार गटाकडे १४ नगरसेवक असल्याचे सांगितले जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक असून, पक्ष सर्वांत मोठा ठरला आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांचा फायदा भाजपने घेत महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे.

हेही वाचा –  NCPA कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ; दरमहा ७,२५० रुपये वाढ, वर्षाला ५० हजारांचा बोनस

गटनेतेपदावरून आधीही रंगले होते नाट्य

काही काळापूर्वी खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार या दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी एकत्र येत राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड केली होती. मात्र, स्थायी समितीवर धानोरकर गटातील नगरसेवकांची नावे न दिल्याने अडूर यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली.

यानंतर अडूर यांना गटनेतेपदावरून हटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अखेर १६ नगरसेवकांच्या पाठिंब्याने सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. अडबाले हे प्रतिभा धानोरकर गटाचे समर्थक मानले जातात. गटनेता बदलाचे हे राजकीय नाट्य जवळपास दीड महिना सुरू होते. या प्रकरणात न्यायालयीन लढाईही झाली होती.

स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्यांवरूनही राजकारण

दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपमधील अंतर्गत वादामुळे पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर गटनेतेपद बदलून आपल्या गटातील व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यासाठी वडेट्टीवार गटाकडून जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे.

सुरेंद्र अडबाले यांना गटनेतेपदी विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे तीन नगरसेवक आता वडेट्टीवार गटाच्या बाजूने गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गटनेता बदलण्यासाठी आवश्यक असलेले १४ नगरसेवकांचे संख्याबळ वडेट्टीवार गटाने गाठल्याचे दिसत आहे.

या घडामोडींमुळे चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सुरेंद्र अडबाले यांना गटनेतेपदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग येतो का आणि काँग्रेसमधील सत्तासमीकरण कोणत्या दिशेने जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button