NCPA कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ; दरमहा ७,२५० रुपये वाढ, वर्षाला ५० हजारांचा बोनस
भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ आणि NCPA यांच्यात चार वर्षांसाठी वेतनवाढ करार; रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करार

मुंबई : नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) मधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ आणि NCPA यांच्यात गुरुवारी (३ सप्टेंबर) महत्त्वपूर्ण वेतनवाढ करार झाला. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा करार करण्यात आला.
या कराराची अंमलबजावणी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या चार वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. करारानुसार NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात ७,२५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना दरवर्षी ५० हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ आणि NCPA व्यवस्थापन यांच्यात झालेला हा तिसरा वेतनवाढ करार आहे. कामगारांच्या वेतनवाढीसाठी संघटनेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा – विनापरवानगी शाळेत गेल्यास गुन्हा दाखल करणार; मुंबई पोलिसांचा सीजेपीला इशारा
NCPA मध्ये संघटनेचे वाढले बळ
यापूर्वी NCPA मध्ये मुंबई लेबर युनियन ही बहुसंख्य कामगारांची संघटना होती. मात्र, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम करत मुंबई लेबर युनियनचे सदस्यत्व आपल्या संघटनेत आणले. त्यानंतर औद्योगिक न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेनंतर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ ही NCPA मधील प्रमाणित कामगार संघटना म्हणून पुढे आली.
या संघटनात्मक विजयामुळे NCPA मधील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचे बळ संघटनेला मिळाले असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.
कामगारांच्या एकजुटीचा विजय
वेतनवाढ कराराबाबत रविंद्र चव्हाण म्हणाले की, कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या संघटनेच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. एकजूट, संघटनात्मक ताकद आणि कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या संघर्षाचा हा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.
या करारामुळे NCPA कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसोबतच बोनसचा लाभ मिळणार असून, भविष्यात अधिक चांगल्या सेवा-सुविधा आणि कामगार कल्याणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कराराच्या स्वाक्षरी समारंभाला NCPAच्या वतीने अध्यक्ष संटूक, संचालक फ्रेडी तलाठी, तांत्रिक संचालक काळे, मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक व्हिन्सेंट डिसूझा उपस्थित होते. तर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे, उपाध्यक्ष प्रशांत वर्तक यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.




