मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करा; आदिती तटकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक; स्थानिकांना भविष्यात टोलमध्ये सवलत देण्याचीही मागणी

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथे होणारी टोल आकारणी स्थगित करावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोकणातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. महामार्गावर रस्ता दुभाजक, उड्डाणपूल, साईड पट्टी यांसह विविध कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अद्याप एकेरी वाहतूक सुरू आहे.
वाहतुकीसाठी अपेक्षित असलेल्या सर्व सोयी-सुविधा पूर्ण झालेल्या नसताना खारपाडा येथे टोल आकारणी सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही. टोल आकारणी स्थगित करण्याची कोकणवासीयांची भावना लक्षात घेऊन हा टोल थांबवावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, भविष्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना टोलमध्ये सवलत देण्याबाबतही विचार करावा, अशी विनंती आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच टोल आकारणीबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका कोकणवासीयांकडून मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर आदिती तटकरे यांच्या मागणीमुळे खारपाडा टोलचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.




