संजय राऊतांचा मोठा दावा; ‘चार मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला’
‘भाजपमध्ये पहिल्यांदाच बंडाळी वाढली; मोदी-शाहांची दहशत आता राहिलेली नाही’, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा दावा

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून, याच पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत राजकारणाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. भाजपमध्ये पहिल्यांदाच अंतर्गत बंडाळीचे स्वरूप वाढले असून, चार मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा राऊत यांनी केला. “ही मोदींच्या पतनाची सुरुवात आहे,” असे सूचक विधानही त्यांनी केले.
कोल्हापुरातील ‘दिनमान साहित्य उत्सव पर्व २’मध्ये दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. सप्टेंबरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याचा दावा तुम्ही वारंवार करता, त्याबाबत विचारले असता त्यांनी १७ सप्टेंबरचा उल्लेख केला.
‘भाजपमध्ये पहिल्यांदाच बंडाळी’
“सप्टेंबर आला आहे, येऊ द्या. मी १७ सप्टेंबरची तारीख दिली आहे. या दिवशी मोदींचा वाढदिवस आहे. या क्षणी भाजपमध्ये पहिल्यांदाच बंडाळीचे स्वरूप वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत ते नव्हते. पक्षात मोदी आणि शाह यांची दहशत होती. ती आता नाही,” असा दावा राऊत यांनी केला.
मोदी सरकारमध्ये मोठा फेरबदल करण्यासाठी मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातात. मात्र, चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबला असल्याचे राऊत म्हणाले. हे मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचाही त्यांनी दावा केला.
‘आधी अमित शाहांचा राजीनामा घ्या’
“आम्ही राजीनामा का द्यायचा? आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्या. त्यांना वगळून आम्ही राजीनामे का द्यायचे?” असा सवाल संबंधित मंत्री करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
जुन्या परिस्थितीत मोदी यांनी अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या मंत्र्यांना तत्काळ हटवले असते, मात्र आता परिस्थिती बदलली असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत बंडाळी हळूहळू वाढेल, असा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडच्या नव्या प्रभागांना सक्षम यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण नको : राहुल कलाटे
‘संघाकडून उपपंतप्रधानपदाची मागणी’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आता नव्या ऊर्जेसह भूमिका घेताना पाहायला मिळत असल्याचे राऊत यांनी म्हटले. मंत्रिमंडळातील फेरबदलासोबत उपपंतप्रधान नियुक्त करण्याची मागणी संघाने केल्याचा दावा त्यांनी केला.
हा उपपंतप्रधान भविष्यातील वारस असेल आणि तो अमित शाह नसणार, असेही राऊत म्हणाले. संघाची ही भूमिका आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेतील अडथळे याचा अर्थ मोदी आणि अमित शाह यांच्या प्रभावाला आव्हान निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘मोदींच्या पतनाची सुरुवात’
“मोदींची दहशत आणि अमित शाहांच्या दादागिरीला ब्रेक लावण्याचे काम सुरू झाले आहे. मोदींच्या पतनाची सुरुवात सुरू झाली आहे. एकदा पतन सुरू झाले की गाडीचा वेग कमी होऊन गाडी खाली जाणार,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, राऊत यांनी केलेले हे दावे राजकीय स्वरूपाचे असून, चार मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याबाबत किंवा संघाने उपपंतप्रधानपदाची मागणी केल्याबाबत केंद्र सरकार किंवा भाजपकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.




