तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईचं FSSAI CEO कडून कौतुक; ‘उपलब्ध मनुष्यबळातूनही मोठं काम शक्य’
‘पनिशमेंट पोस्टिंग’ची मानसिकता बदलण्याची गरज; रजित पुन्हानी यांनी महाराष्ट्र FDA आयुक्तांच्या कार्यपद्धतीचं दिलं उदाहरण

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या कडक आणि धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत आहेत. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. आता त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक थेट भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (FSSAI) CEO रजित पुन्हानी यांनी केले आहे.
एका मुलाखतीत रजित पुन्हानी यांनी अन्न सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत असलेल्या जुन्या मानसिकतेवर भाष्य केले. अन्न सुरक्षा विभागातील पोस्टिंगकडे अनेकदा ‘पनिशमेंट पोस्टिंग’ म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे अनेक अधिकारी या जबाबदारीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असत. मात्र, आता ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे पुन्हानी यांनी सांगितले.
तुकाराम मुंढेंच्या कामाचं दिलं उदाहरण
अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त मनुष्यबळाचीच गरज असते असे नाही, हे तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येते, असे पुन्हानी यांनी नमूद केले.
उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीनेही मोठ्या प्रमाणावर तपासण्या आणि अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करता येते. तुकाराम मुंढे यांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता उपलब्ध टीमच्या माध्यमातून हजारो तपासण्या केल्याचे पुन्हानी यांनी सांगितले. त्यामुळे इच्छाशक्ती आणि योग्य नेतृत्व असेल, तर उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून मोठ्या प्रमाणावर काम करता येते, असा संदेश त्यांच्या कार्यपद्धतीतून मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – संजय राऊतांचा मोठा दावा; ‘चार मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला’
महाराष्ट्रात अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर भर
तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला आहे. रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, गोदामे तसेच इतर खाद्य आस्थापनांची तपासणी वाढवण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर परवाने निलंबित करण्यासह विविध प्रकारची कारवाई केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात आल्याने अन्न सुरक्षा विभागाच्या कामाकडे नागरिकांचेही लक्ष वेधले गेले आहे.
‘अन्न सुरक्षा विभागाला अधिक महत्त्व देण्याची गरज’
रजित पुन्हानी यांनी अन्न सुरक्षा विभागाला अधिक महत्त्व देण्याची गरज असल्याचेही सांगितले. देशात आरोग्य व्यवस्थेला दीर्घकाळापासून महत्त्व दिले जात असले तरी अन्न सुरक्षा ही तुलनेने नवीन व्यवस्था आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक राज्यात स्वतंत्र आणि सक्षम अन्न सुरक्षा आयुक्त असणे गरजेचे असल्याचे मतही पुन्हानी यांनी व्यक्त केले. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यांचा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंध असल्याने अन्न सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले.




