ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी–चऱ्होली–चिखली परिसरात उभारणार ‘नाना पाटेकर नाट्यगृह’?

कला - सांस्कृतिक केंद्रासाठी आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

जागा निश्चित करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रशासनाला सूचना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी मोशी–चऱ्होली–चिखली या वेगाने विकसित होणाऱ्या निवासी पट्ट्यात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने भव्य नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागा निश्चित करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि विस्तार झपाट्याने वाढत असताना मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त सभागृहाची आवश्यकता निर्माण झाली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या धर्तीवर शहरात मोठ्या आसनक्षमतेचे नाट्यगृह उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर या मागणीला ठोस प्रकल्पाचे स्वरूप देऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी भूमिका लांडगे यांनी मांडली आहे.

हेही वाचा

जगाला टॅरिफचे इशारे देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी कोलांटउडी; रशियाकडून ४८ लाख टन डिझेल खरेदीचा करार

मोशी, चऱ्होली आणि चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहत असून नागरिकांची वस्ती वाढत आहे. या भागातील नागरिक, कलाकार, नाट्यसंस्था, शाळा आणि महाविद्यालयांना नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, साहित्य संमेलने, व्याख्याने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे.

नाना पाटेकर यांच्या कार्याचा सन्मान…

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि सामाजिक क्षेत्रातील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून प्रस्तावित केंद्राला ‘नाना पाटेकर नाट्यगृह व सांस्कृतिक केंद्र’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याबरोबरच नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल आणि शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आधुनिक सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेवर भर…

प्रस्तावित प्रकल्पात प्रशस्त रंगमंच, दर्जेदार ध्वनी व प्रकाशयोजना, कलाकारांसाठी स्वतंत्र कक्ष, सरावासाठी जागा, लघु कार्यक्रमांसाठी सभागृह, दिव्यांगसुलभ प्रवेशव्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा सुविधांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुरेसे वाहनतळ, सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थापन यांचा जागा निश्चित करतानाच विचार करावा, असेही लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे. संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन जागा निश्चिती आणि प्रकल्प अहवालाची कार्यवाही तातडीने सुरू करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी. याबाबत सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख केवळ औद्योगिक नगरी म्हणून मर्यादित न राहता, सांस्कृतिक आणि कलाविश्वातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही निर्माण व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. मोशी–चऱ्होली–चिखली परिसरातील वाढती लोकसंख्या आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेता, येथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज भव्य नाट्यगृह उभारणे आवश्यक आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने हे नाट्यगृह उभारल्यास त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचा सन्मान होईल. त्याचबरोबर नवोदित कलाकार, स्थानिक नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभावंतांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल. हा प्रकल्प केवळ वास्तू उभारण्यापुरता मर्यादित न राहता, शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारा आणि पुढील पिढ्यांना कलेशी जोडणारा उपक्रम ठरावा, अशी आमची भूमिका आहे.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button