TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

सोमेश्वर कारखान्यात सुनेत्रा पवार यांची ‘क्लीन स्वीप’; २१ पैकी २१ जागांवर विजय, विरोधकांना धक्का

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची पहिलीच निवडणूक; पुरुषोत्तम जगताप यांच्यासह विरोधी पॅनलचा पराभव, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विरोधकांना पराभूत करत कारखान्यावर आपले वर्चस्व कायम केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रथमच निवडणुकीची धुरा सांभाळली होती. त्यामुळे या निकालाकडे विशेष लक्ष लागले होते.

दुपारपासूनच विजयाचे संकेत

निवडणुकीच्या मतमोजणीत संग्राम सोरटे, प्रमोद काकडे, अभिजीत काकडे आणि वसंतराव दगडे हे चार उमेदवार दुपारीच विजयी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला. संध्याकाळपर्यंत मतमोजणीचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आणि सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवल्याचे समोर आले.

या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनललाही पराभवाचा सामना करावा लागला. जगताप यांनी भाजपच्या मदतीने पॅनल उभे केल्याचे सांगितले जात होते. मात्र, मतदारांनी सुनेत्रा पवार यांच्या पॅनलला कौल दिला. गट क्रमांक दोनमधून पुरुषोत्तम जगताप सुरुवातीला पिछाडीवर होते. अखेर त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा –  इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला धक्का; प्रवक्ते आनंद दुबे यांचा राजीनामा

या निकालामुळे सोमेश्वर कारखान्यातील सत्तासमीकरण बदलले असून, जगताप यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. निवडणुकीत शरद पवार यांच्याशी संबंधित गटाच्या राजकीय प्रभावाबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

विजयानंतर अभिजीत काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुरुषोत्तम जगताप यांच्यावर टीका केली. तसेच या विजयाचे श्रेय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना दिले.

सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीत स्वतःला झोकून देत प्रचार केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच विजय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी बारामती तालुक्यातील मतदारांनी दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याची भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

सोमेश्वरच्या राजकारणात निकालाची चर्चा

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच निवडणुकीची जबाबदारी सांभाळली आणि पॅनलला सर्व २१ जागांवर विजय मिळवून दिला. त्यामुळे या निकालाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. कारखान्याच्या आगामी कारभारात नव्या संचालक मंडळाची भूमिका काय असेल आणि सभासदांच्या अपेक्षा कशा पूर्ण केल्या जातील, याकडे आता बारामती आणि पुरंदर परिसरातील सभासदांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button