Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर हादरलं! एशियन हॉस्पिटलच्या NICUला मध्यरात्री भीषण आग; ९ नवजात बाळांसह ५८ रुग्ण सुखरूप

एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी १०-१५ मिनिटांत आगीवर मिळवले नियंत्रण

छत्रपती संभाजीनगर : अमरावतीतील रुग्णालयाच्या आगीत तीन नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. पहाटे पावणे तीनच्या सुमारास हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (NICU) आग लागली. त्यावेळी NICUमध्ये तब्बल ९ नवजात बाळांवर उपचार सुरू होते. सुदैवाने अग्निशमन दल, पोलीस, डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्व बाळांसह रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

प्राथमिक माहितीनुसार, एसीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचे लक्षात येताच हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.

९ नवजात बाळांना सुरक्षित बाहेर काढले

आग थेट NICUमध्ये लागल्याने नवजात बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे बचाव पथकासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. हॉस्पिटल कर्मचारी, डॉक्टर आणि बचाव पथकाने तातडीने हालचाली करत सर्व ९ बाळांना NICUमधून सुखरूप बाहेर काढले.

खबरदारीचा उपाय म्हणून या बाळांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. त्यापैकी ५ बाळांना घाटी रुग्णालयात, ३ बाळांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बाळाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा –  पुढील १० वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे लक्ष्य; क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासाला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पहिल्या मजल्यावरील ५८ रुग्णांचे रेस्क्यू

ज्या पहिल्या मजल्यावर NICU आहे, त्या मजल्यावर एकूण ५८ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये NICUमधील ९ बाळांसह जनरल विभागातील ३६ आणि स्पेशल रूममधील १३ रुग्णांचा समावेश होता. या सर्व रुग्णांनाही सुरक्षितपणे बाहेर हलवण्यात आले.

बचावकार्याला वेग देण्यासाठी तब्बल ३० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवाहरनगर पोलीस तसेच आरसीपीच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.

वेळीच मिळालेली आगीची माहिती, अग्निशमन दलाची तत्परता तसेच पोलीस, डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मोठी दुर्घटना टळली. ९ नवजात बाळांसह एकूण ५८ रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button