TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमित साटम यांच्या टीकेवर मनसेचा पलटवार; गजानन काळेंनी भाजप नेत्यांच्या शिक्षणाचा दाखला देत साधला निशाणा

राज ठाकरेंच्या नातवाच्या शाळेवरून वाद पेटला; ‘मराठीचा मुद्दा उपस्थित करताना भाजपने आधी स्वतःकडे पाहावे’

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नातवाच्या शाळेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या मराठीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेत अमित साटम यांच्यावर जोरदार पलटवार केला.

अमित साटम यांनी राज ठाकरे यांनी आपल्या नातवाला मराठी माध्यमाच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत प्रवेश देऊन दाखवावा, असे आव्हान दिले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गजानन काळे यांनी भाजप नेत्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शिक्षणाचा संदर्भ देत भाजपवर निशाणा साधला.

भाजप नेत्यांनी आधी स्वतःकडे पाहावे’

गजानन काळे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांच्या शिक्षणाचा दाखला देत इंग्रजी शाळेत शिक्षण घेतल्याने त्यांच्या मराठीप्रेमावर प्रश्न उपस्थित करता येईल का, असा सवाल केला.

याचबरोबर त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या शिक्षणाचा संदर्भ देत भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही टीका केली.

हेही वाचा –  शहरातील कचरा संकलनातील बोजवाऱ्यावर कविता भोंगळे आक्रमक!

अमित साटम यांच्यावर थेट निशाणा

गजानन काळे यांनी अमित साटम यांच्या शिक्षणाचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांच्या शिक्षणाचा संदर्भ देत भाजपने इतरांच्या शाळांवर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचा विचार करावा, असा टोला लगावला.

मनसे आणि भाजपमधील हा वाद आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठी भाषा, शिक्षणाचे माध्यम आणि मुंबईतील मराठी अस्मिता या मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

अमित साटम नेमकं काय म्हणाले होते?

अमित साटम यांनी राज ठाकरे यांनी आपल्या नातवाला बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देऊन दाखवावा आणि त्यानंतरच मराठीच्या मुद्द्यावर भूमिका मांडावी, असे आव्हान दिले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button