कॉकरोच जनता पार्टीमध्ये मोठी फूट; ‘सीजेपी डेमोक्रेटिक’ची स्थापना

कॉकरोच जनता पार्टीमध्ये मोठी फूट; ‘सीजेपी डेमोक्रेटिक’ची स्थापना

अहमदाबाद : कॉकरोच जनता पार्टीमध्ये (CJP) मोठी फूट पडल्याचा दावा करण्यात आला असून, मूळ आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. अहमदाबादचे रहिवासी मनीष ब्रह्मभट्ट यांनी गुरुवारी (३ सप्टेंबर) दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक’ (CJP Democratic) या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली.

कॉकरोच जनता पार्टी आता पूर्णपणे अरविंद केजरीवाल यांची पार्टी बनली असून, मूळ आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आल्याचा गंभीर आरोप ब्रह्मभट्ट यांनी केला. सीजेपीच्या स्थापनेनंतर सर्व काही बदलले असून पक्ष केवळ ‘टीम केजरीवाल’ बनून राहिल्याचा दावाही त्यांनी केला.

मनीष ब्रह्मभट्ट यांनी सीजेपीचे अभिजीत दीपके यांच्यावरही थेट निशाणा साधला. दीपके यांनी कोणत्याही मूळ कार्यकर्त्यांना किंवा आंदोलनाशी जोडलेल्या व्यक्तींना विश्वासात न घेता घरबसल्या १२ जणांची टीम तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. या टीममध्ये आम आदमी पार्टीशी संबंधित आठ व्यक्ती, तसेच स्वतःचे मित्र आणि मैत्रिणींना स्थान देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा –  डीजेविरोधातील भूमिकेमुळे विद्यानंद बापटांवर हल्ला; माजी गणेश मंडळ अध्यक्ष ताब्यात

देशातील प्रत्येक राज्यातून पाच प्रतिनिधी निवडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीला मनमानी पद्धतीने निर्णय घेता येणार नाही, अशी भूमिका होती. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली आणि त्यानंतर पक्षात मनमानी कारभार सुरू झाल्याचा आरोप ब्रह्मभट्ट यांनी केला.

अरविंद केजरीवाल यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा वापर करून केजरीवाल यांनी राजकीय फायदा घेतल्याचा दावा त्यांनी केला. पक्ष स्थापन करताना जनतेला ‘जनता सांगेल त्याला तिकीट देऊ’ आणि ‘स्वराज्य आणू’, अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर स्वराज्य कायदा बाजूला सारण्यात आल्याचे ब्रह्मभट्ट म्हणाले.

आंदोलन यशस्वी झाल्यानंतर केजरीवाल यांनी अभिजीत दीपके यांच्यासोबत डील करून आंदोलन हायजॅक केल्याचा आरोपही त्यांनी केला. आम आदमी पार्टीतील नेत्यांना सीजेपीमध्ये समाविष्ट करण्यासाठीच विविध तडजोडी करण्यात आल्याचे ब्रह्मभट्ट यांनी म्हटले.

दरम्यान, सीजेपीच्या नव्या कार्यकारिणीत एकाही मुस्लिम पुरुषाला किंवा शीख प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मूळ आंदोलनाची भूमिका आणि लोकशाही मूल्ये कायम ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘सीजेपी डेमोक्रेटिक’ स्थापन केल्याचे ब्रह्मभट्ट यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *