इथेनॉल बंद झाल्यास साखर कारखाने बंद पडतील; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इथेनॉलमुळे कारखान्यांना FRP देणे आणि कर्ज फेडणे शक्य; महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास

मुंबई : इथेनॉल ब्लेंडिंग बंद केल्यास राज्यातील साखर कारखान्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होईल आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. इथेनॉल ब्लेंडिंगमुळेच सध्या साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इथेनॉल ब्लेंडिंग बंद झाले तर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) देऊ शकणार नाहीत. तसेच कारखान्यांना कर्जाची परतफेड करणेही शक्य होणार नाही आणि अनेक कारखाने बंद पडतील, अशी शक्यता मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
इथेनॉलला विरोध करून प्रश्नचिन्ह निर्माण केल्यास सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचेच होईल. कारण इथेनॉल तयार करणारा मुख्य घटक शेतकरी आहे. जगभरात इथेनॉल मिश्रित इंधनावर वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे इथेनॉलबाबत चुकीचे कथानक निर्माण करण्यामागे कोण आहे, याचाही विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – कॉकरोच जनता पार्टीमध्ये मोठी फूट; ‘सीजेपी डेमोक्रेटिक’ची स्थापना
महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या 660 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून, 1 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने राज्य वेगाने वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विकासाचा शाश्वत दर कायम ठेवला तर महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जगातील अनेक अर्थव्यवस्था दोन ते अडीच टक्के दराने वाढत असताना, तेलाच्या संकटानंतरही भारत 7.8 टक्के आणि महाराष्ट्र 8.8 टक्के विकासदराने प्रगती करत आहे. महाराष्ट्राचा विकासदर 10 टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
2029 पर्यंत मुंबईतील लोकल मेट्रोसारख्या
मुंबईकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मुंबईची लोकल रेल्वे व्यवस्था अद्याप जुन्या डब्यांवर आधारित आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मेट्रोसारखे आधुनिक डबे मुंबई लोकलसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
2029 पर्यंत मुंबईतील सर्व लोकल गाड्या मेट्रोसारख्या आधुनिक करण्यात येणार आहेत. या लोकलमध्ये बंद होणारे दरवाजे असतील तसेच सेकंड क्लासमध्ये एसीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. एसी सुविधा दिल्यानंतरही सेकंड क्लासचे विद्यमान भाडे कायम राहणार असून त्यात वाढ केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.




