नागपुरात आजपासून डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटवर बंदी; पुण्यातही मागणी जोरात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

नागपूर : राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू असून, उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा यासाठी गणेश मंडळांकडून तयारी करण्यात येत आहे. मात्र, गणेशोत्सवासोबतच सणासुदीचा काळ सुरू झाल्याने ध्वनी प्रदूषणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये डीजे, डॉल्बी, लाऊडस्पीकर तसेच ढोल-ताशांच्या आवाजाबाबत चर्चा सुरू असतानाच नागपुरात प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
नागपुरात ३ सप्टेंबरपासून डीजेवर बंदी
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपुरात ३ सप्टेंबर २०२६ पासून १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, नागपुरात आज रात्रीपासून डीजे, डीजेची वाहने, डिम लाईट आणि लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध असतील. गणेशोत्सव तसेच आगामी सणांच्या काळात ध्वनी आणि प्रकाशामुळे निर्माण होणारा त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नियम मोडल्यास कठोर कारवाई
पोलीस आयुक्तांच्या आदेशामुळे गणेशोत्सवातील मिरवणुका आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजे तसेच डॉल्बी साऊंड सिस्टिमच्या वापरावर निर्बंध आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड सक्तीला तात्पुरती स्थगिती; आशीष शेलारांचे निर्देश
पुण्यातही डीजे, डॉल्बी, ढोल-ताशांवर बंदीची मागणी
दरम्यान, पुण्यातही गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डीजे, डॉल्बी तसेच ढोल-ताशांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी सामान्य नागरिक विद्यानंद बापट यांनी केली आहे.
पुणे महापालिकेच्या बैठकीत त्यांनी सार्वजनिकपणे डीजेवर बंदी घालण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर गणेशोत्सवातील मिरवणुकांवरही बंदी घालावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढते आणि त्याचा पुणेकरांना त्रास होतो, असे बापट यांचे म्हणणे आहे. ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
पुण्यातील गणेश मंडळांची भूमिका काय?
नागपुरात डीजेवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता पुण्यातील गणेश मंडळे या विषयावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुका, पारंपरिक वाद्ये आणि ध्वनी मर्यादा यावरून प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय कसा साधला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, नागपुरातील डीजेबंदीवर नागपूरकर तसेच गणेश मंडळांकडून कोणत्या प्रतिक्रिया येतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.





