महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ भारतात; आयसीसीची मोठी घोषणा

Women’s Champions Trophy 2027 | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला क्रिकेटबाबत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. पहिल्यावहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Women’s Champions Trophy 2027) यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान भारतात खेळवली जाणार असून, मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये सर्व सामने रंगणार आहेत.
आयसीसीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या स्पर्धेचे सामने मुंबईतील ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ (CCI) आणि वडोदरा येथील ‘वडोदरा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम’वर आयोजित केले जातील. मूळ नियोजनानुसार ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती; मात्र आयसीसीच्या प्रशासकीय सुधारणांच्या अंमलबजावणीमुळे बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातून भारताच्या नावावर १ सप्टेंबर रोजी अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी होणारे संघ आणि फॉरमॅट
महिला चॅम्पियन्स ट्रॉफी टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असून यात जगातील अव्वल ६ संघ आमनेसामने असतील:
सहभागी संघ: भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका.
स्पर्धेचे स्वरूप: सर्व संघ ‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने एकमेकांशी भिडतील. प्रत्येक संघ उर्वरित पाच संघांसोबत साखळी सामने खेळेल. साखळी फेरीअखेर अव्वल ठरणारे दोन संघ २८ फेब्रुवारी २०२७ रोजी अंतिम फेरीत विजेतेपदासाठी लढतील.
हेही वाचा
दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल
A landmark moment for women’s cricket awaits.
The dates and venues for the inaugural Women’s Champions Trophy in 2027 are now confirmed, as India prepares to welcome the world’s best teams from 14-28 February.
Read more ➡️ https://t.co/QrY2iyDwyU pic.twitter.com/m7cWLxY8I8
— ICC (@ICC) September 2, 2026
पाकिस्तान स्पर्धेतून का बाहेर?
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून पाकिस्तान संघाचा पत्ता कट झाला आहे. ६ जुलै रोजी निश्चित करण्यात आलेल्या आयसीसी महिला टी-२० क्रमवारीच्या कट-ऑफ तारखेनुसार अव्वल संघांना थेट पात्रता मिळाली. क्रमवारीतील पिछाडीमुळे पाकिस्तानला या स्पर्धेत स्थान मिळवता आले नाही. एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघासमोर टी-२० विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असणार असल्याने क्रिकेटप्रेमींना थरारक लढती पाहायला मिळणार आहेत.





