ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड सक्तीला तात्पुरती स्थगिती; आशीष शेलारांचे निर्देश
गौर-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; प्रताप सरनाईक म्हणाले, ‘कार्ड आवश्यक, तांत्रिक अडचणी असतील तर दूर करू’

मुंबई : एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अनिवार्य केलेल्या **‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC)**च्या सक्तीला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत. गौर आणि गणपती उत्सवाच्या काळात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत ही सक्ती तात्पुरती थांबविण्याचे निर्देश दिले.
शासन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवासासाठी NCMC कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास काही प्रवाशांकडून पूर्ण तिकीट आकारले जात असल्याची बाब समोर आल्यानंतर शेलार यांनी हस्तक्षेप केला.
‘उत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय नको’
NCMC कार्डच्या नोंदणी प्रक्रियेत किंवा कार्ड उपलब्धतेमध्ये अडचणी येत असल्यास उत्सवाच्या काळात त्याचा फटका महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसू नये, अशी भूमिका आशीष शेलार यांनी घेतली. त्यामुळे कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश त्यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा – सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखलेची ‘अडकित्ता’मध्ये भावनिक गोष्ट; 11 सप्टेंबरला प्रीमियर
प्रताप सरनाईकांचा पलटवार
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आशीष शेलार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना कार्ड योजनेच्या अंमलबजावणीची गरज असल्याचे स्पष्ट केले.
सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ९.१ कोटी प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. एसटी महामंडळाला मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रक्रियेत वित्त विभागाकडून अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी NCMC कार्ड लागू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्यास त्या दूर करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
‘आधी चर्चा केली असती तर सामोपचाराने तोडगा निघाला असता’
आशीष शेलार यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी परिवहन मंत्री म्हणून आपल्याशी चर्चा केली असती, तर या विषयावर सामोपचाराने तोडगा काढता आला असता, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
त्यामुळे NCMC कार्डच्या अंमलबजावणीवरून महायुतीतील दोन नेत्यांमध्ये मतभेद समोर आले असले, तरी तांत्रिक अडचणी दूर करून योजनेची अंमलबजावणी सुरळीत करण्यावर परिवहन विभागाचा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे.





