पिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड गुन्हेवृत्त । कौटुंबिक हिंसाचारापासून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाचा..!

दि.०२ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १६ गुन्हे दाखल

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. ०२ सप्टेंबर २०२६  विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, फसवणूक, अपहरण, चोरी, अपघात तसेच अंमली पदार्थ विक्री अशा स्वरूपाचे एकूण १६ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूला मारहाण, अल्पवयीन तरुणीवर जीवघेणा हल्ला करून तिचे अश्लील छायाचित्रण, प्रेमसंबंधातून इमोशनल ब्लॅकमेल करत उकळलेले लाखो रुपयांचे दागिने, सायबर फसवणुकीचे दोन प्रकार, कोट्यवधींचा गुंतवणूक घोटाळा, वैद्यकीय निष्काळजीपणातून झालेला मृत्यू, विविध ठिकाणी झालेल्या मारहाणी व अपघात, तसेच आळंदीत आढळलेला नवजात बालिकेचा मृतदेह अशा घटनांचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत पुढील तपास सुरू आहे.

गुन्हानिहाय सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे —

१. सुनेने सासरच्यांच्या मदतीने सासूला दिली जीवे मारण्याची धमकी

गहुंजे (मावळ) येथील लोढा बेलमोंडे टॉवर क्र. १२ मध्ये राहणाऱ्या ६८ वर्षीय अनिता राजीव मेहताणी यांना त्यांची सून, सासरे व सासू यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. तक्रारदार यांच्या नोकराच्या खोलीत गेल्याच्या रागातून सुनेला व तिच्या वडिलांना धक्काबुक्की करत छातीवर दाब देण्यात आला, तर सासूने हात धरून ठेवले असता सुनेने गळा दाबून चाकूसदृश वस्तूने जखमी करत मारण्याची धमकी दिली. तसेच तक्रारदारांचे पती व मुलालाही मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून आरोपी अटकेत नाहीत.


२. अल्पवयीन तरुणीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न, विवस्त्र करून फोटो व्हायरल

आळंदी व वाकड परिसरात एका २४ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तसेच तिचे अश्लील छायाचित्रण करून ते व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी किशोर उर्फ कृष्णा अशोक पवार (२९) याने १६ ऑगस्ट रोजी तक्रारदारास मोटरसायकलवरून आळंदीतील डोंगरावर नेत गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला व चाकूने केस कापून गालावर वार केला. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी पुन्हा तिला बळजबरीने वाकड येथील लॉजवर नेऊन विवस्त्र करत फोटो काढले व ते तिच्या भावाला पाठवून व्हायरल केले. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


३. प्रेमसंबंधातून इमोशनल ब्लॅकमेल करत तरुणीकडून ९७ लाखांचे दागिने उकळले

पिंपरी येथील अशोक थिएटर परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीला जवळीकीचे फोटो कुटुंबीयांना दाखवण्याची व सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपी भावेश प्रदीप लखवाणी (२५) याने फेब्रुवारी ते जुलै २०२६ या कालावधीत तिच्याकडून तब्बल ९७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने उकळल्याचे उघड झाले आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


४. शाळेतील कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून सायबर भामट्यांकडून सव्वा लाखाची फसवणूक

भूकुम येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये काम करणाऱ्या किशोर सूर्यवंशी (२५) यांच्या दोन बँक खात्यांमधून ८ ऑगस्ट रोजी परस्पर १,०३,५८२ रुपये अनोळखी खात्यांवर वळवून ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बावधन पोलिसांनी राजस्थानस्थित दोन संशयितांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.


५. कॅफे मालक असल्याचे भासवून गुंतवणुकीच्या नावाखाली साडेअकरा कोटींची फसवणूक

वाकड येथील व्हाईट स्क्वेअर इमारतीत कार्यालय असलेल्या सचिन साळुंखे व त्याची पत्नी श्वेता साळुंखे यांनी स्वतःला ‘कॅफे पीटर’चे मालक भासवत विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून तक्रारदार दीपक बर्गे व त्यांच्या साक्षीदारांनी मे २०२२ पासून आतापर्यंत एकूण ११ कोटी ६७ लाख ७ हजार रुपये गुंतवले. मात्र सही-अधिकाराचा गैरवापर करत आरोपींनी कंपनीतील रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून अपहार केल्याचे उघड झाले. वाकड पोलिसांत महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.


६. बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे तरुणाची ४२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

‘ट्रेड एक्स’ या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या नावाने फोन करून गुंतवणुकीचे आमिष दाखवत सुनील दवंगे (२९) यांच्याकडून ऑक्टोबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या काळात टप्प्याटप्प्याने ४२ लाख ४३ हजार रुपये गुंतवून घेण्यात आले. रक्कम परत मागितली असता व्यवहार शून्य दाखवण्यात आला. सेबीच्या संकेतस्थळावर तपासले असता संबंधित कंपनी नोंदणीकृतच नसल्याचे स्पष्ट झाले. वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल.


७. ऑपरेशनदरम्यान निष्काळजीपणामुळे पतीचा मृत्यू, डॉक्टर व भूलतज्ज्ञावर गुन्हा

पिंपळे गुरव सांगवी येथील सुश्रुत सर्जिकल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निष्काळजीपणामुळे पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार निर्मला काटखेडे यांनी दिली आहे. ही घटना २७ नोव्हेंबर २०२३ रोजीची असून ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने चौकशीअंती उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा निष्काळजीपणा असल्याचा अहवाल २५ ऑगस्ट २०२६ रोजी दिला. त्यानुसार डॉ. मधू पठाणु व भूलतज्ज्ञ डॉ. अभिषेक लोणीकर यांच्याविरोधात सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


८ व १०. आर्थिक वादातून थेरगाव व रहाटणीत परस्परविरोधी मारहाणीच्या तक्रारी

थेरगाव व रहाटणी परिसरात रामराजे शेंडगे व किशोर जगताप यांच्यात उसने दिलेल्या रकमेवरून वाद विकोपाला गेला. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी थेरगाव येथे जगताप यांनी शेंडगे यांना मारहाण करत कडीने डोक्यात वार करून जखमी केल्याची तक्रार काळेवाडी पोलिसांत दाखल आहे. तर त्याचवेळी रहाटणीतील प्यासा बारजवळ जगताप यांनी उसने दिलेले २७,५०० रुपये परत मागितल्यावरून शेंडगे यांनी धक्काबुक्की व सिमेंटचा तुकडा मारून जखमी केल्याची स्वतंत्र तक्रारही दाखल झाली आहे.


९. किवळेत टोळक्याकडून तरुणावर हॉकी स्टिक व कोयत्याने हल्ला

किवळे येथे के टाऊन इमारतीजवळ २४ वर्षीय पियुष चव्हाण यांना फोन करून बोलावत इशान डे व त्याच्या तीन साथीदारांनी १ सप्टेंबर रात्री हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली. त्यानंतर गाडीतून कोयता काढून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. भांडण सोडवायला आलेल्या तक्रारदाराच्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. देहूरोड पोलिसांनी आर्म्स ॲक्टसह चार जणांना अटक केली आहे.


११. पिंपळे निलखमध्ये किरकोळ कारणावरून झेप्टो कर्मचाऱ्यास स्टील रॉडने मारहाण

पिंपळे निलख येथील झेप्टो स्टोअरजवळ वेटिंग एरियात थांबलेले असताना यश दुबे (२३) यांना विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. जाब विचारला असता आरोपींपैकी एकाने स्टील रॉडने मारहाण करत जखमी केले. सांगवी पोलिसांत दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल.


१२. तळवड्यात भरधाव मोटरसायकलची पादचारी महिलेला धडक, गंभीर जखमी

त्रिवेणी चौक, तळवडे येथे रस्ता ओलांडत असलेल्या शीतल काळे यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. चिखली पोलिसांनी वाहनचालकाविरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत नोटीस बजावली आहे.


१३. खेडमध्ये अज्ञात वाहनाची धडक, डोळ्याला गंभीर इजा

कुरुळी गावच्या हद्दीत सिगारेट घेण्यासाठी जात असलेल्या सुधाकर राठोड यांना १ सप्टेंबर पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोके व डोळ्याला गंभीर मार लागला. दक्षिण महाळुंगे पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल.


१४. सांगवीत तीन महिलांकडून तुपाच्या पाऊचसह साडेतेरा हजारांचा ऐवज लंपास

काटेपुरम चौक, सांगवी येथील स्टार बाजार या दुकानातून तीन अनोळखी महिलांनी गोवर्धन तूप, बदाम व काजू असा एकूण १३,३२० रुपये किमतीचा खाद्यमाल चोरून नेल्याची तक्रार महेश पवार यांनी दिली आहे.


१५. आळंदीत इंद्रायणी नदीकाठी नवजात बालिकेचा मृतदेह आढळला

आळंदी येथील स्मशानभूमीजवळील इंद्रायणी नदीपात्राच्या काठी १-२ महिन्याच्या नवजात मुलीचा मृतदेह कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. अपत्यजन्म किंवा मृत्यू लपवण्यासाठी अज्ञात पालकांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय असून आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


१६. रावेतमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक

रावेत येथील नर्मदा पार्क कॉर्नरजवळ २ सप्टेंबर पहाटे गस्तीदरम्यान पोलिसांनी कालिदास कांबळे (२४) व करण नलावडे (१८) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हे अंमली पदार्थ (किंमत ४८,०००/-) व एक मोपेड (किंमत ५५,०००/-) असा एकूण १,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button