मावळात शिक्षणाचा नवा अध्याय: जिल्हा परिषदेच्या ८०० शिक्षकांना मिळणार ‘एआय’चे स्मार्ट धडे

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
बदलत्या डिजिटल युगाशी जुळवून घेत शिक्षण क्षेत्रात आधुनिकतेची कास धरण्यासाठी मावळ तालुका सज्ज झाला आहे. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांना अद्ययावत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचे धडे देण्यासाठी एका विशेष चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ करण्यात आला आहे. तालुक्यातील शंभर टक्के शिक्षकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्याचा हा एक क्रांतिकारी उपक्रम ठरत आहे.
१ ते ४ सप्टेंबर या कालावधीत ‘नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज’ येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि मावळच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडत आहे. दोन टप्प्यांत आयोजित या उपक्रमात मावळ तालुक्यातील सुमारे ८०० शिक्षक सहभागी होऊन एआयचे धडे गिरवत आहेत.

हेही वाचा
‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमातून रावेत कीवळे मामुर्डीच्या वाहतूककोंडी मुक्तीचा निर्धार
उद्घाटन प्रसंगी बोलताना नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी, “आधुनिक शिक्षण पद्धतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली असून, यामुळे अध्यापन अधिक प्रभावी व सोपे होईल,” असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी प्राध्यापक डॉ. मिलिंद ओव्हाळ, केंद्रप्रमुख सविता क्षीरसागर, संगीता भालघरे, मुकुंद तनपुरे आणि सुहास विटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी ‘रोबोटिक्स इंडिया’च्या प्रोग्राम लीड रेवती फणसे यांच्या नेतृत्वाखाली स्वरांगी गायकवाड, गौरव कुमार, आदिती पाटील, यश पुंड आणि मोहित वाकोडे यांनी सुलभक (ट्रेनर्स) म्हणून मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद तनपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण प्रशिक्षणाचे नियोजन व समन्वय विषय साधन व्यक्ती सुचिता भोई आणि आरती कुंडले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता भोई यांनी तर उपस्थितांचे आभार सुहास विटे यांनी मानले.





