Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यभर २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; युवकांना थेट नोकरीची संधी

महाविद्यालयांनी उद्योगांशी समन्वय वाढवून रोजगार मेळावे घेण्याचे आवाहन; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ आयोजित करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण देणे पुरेसे नसून त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये मिळणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि विद्यार्थ्यांची कौशल्ये यांची सांगड घालण्यासाठी महाविद्यालयांनी उद्योग, कंपन्या आणि उद्योजकांशी अधिक समन्वय साधावा. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आणि रोजगार महाकुंभ आयोजित करावेत.

हेही वाचा –  सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना कायद्यानुसार बदलांसाठी एक वर्षाची मुदत

‘रोजगार महाकुंभ’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध कंपन्या, उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे तरुणांना थेट मुलाखती देण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगार मिळण्यासही मदत होणार आहे.

महाविद्यालयांनी परिसरातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावे नियमितपणे आयोजित करावेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी शिक्षणसंस्था आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘रोजगार महाकुंभ’ हा राज्यातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो. त्यामुळे अधिकाधिक महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभागी होऊन युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button