जरांगेंची प्रकृती खालावल्याने मराठा समाज आक्रमक; बीड-जालना महामार्गावर रास्तारोको
जालन्यात मध्यरात्री टायर जाळून निषेध, उद्या जिल्हा बंदची हाक

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरोप करत बीड आणि जालना जिल्ह्यांत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जालना-जळगाव महामार्गावरील केदारखेडा येथे मध्यरात्री मराठा समाज बांधवांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
जालन्यात जिल्हा बंदची हाक
जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांनी उद्या जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन जरांगे यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
हेही वाचा – राज्यभर २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; युवकांना थेट नोकरीची संधी
बीड-जालना महामार्गावर रास्तारोको
दरम्यान, बीडमध्येही मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेत बीड-जालना महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत आंदोलकांनी टायर पेटवून सरकारचा निषेध केला. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलकांनी रास्तारोको मागे घेत टायर रस्त्यावरून बाजूला केले. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंतरवाली सराटी येथे पाठवण्यात आले होते. मात्र, सरकारचे शिष्टमंडळ अद्याप का आले नाही, असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, सरकारविरोधात घोषणाबाजी करत मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. बीड आणि जालना जिल्ह्यांतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.





