ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अप्पू घरच्या मुदतवाढीपूर्वी सुरक्षिततेची खात्री करा : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

प्रस्तावित उपक्रम, खेळणी, सुरक्षा व्यवस्था आणि परवानग्यांचे सादरीकरण करण्याची मागणी

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध अप्पू घर अम्युजमेंट पार्क प्रकल्पाला मुदतवाढ देण्यापूर्वी प्रस्तावित प्रकल्पाची संपूर्ण माहिती, सुरक्षितता आणि नियोजनाची खात्री करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न सिताराम काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी २८ ऑगस्ट २०२६ रोजी आयुक्तांना पत्र देऊन सदर प्रकल्पाबाबत तूर्तास कोणतीही मुदतवाढ देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अप्पू घर हे अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या आकर्षणाचे पर्यटन व मनोरंजनस्थळ आहे. या प्रकल्पामध्ये मनोरंजनात्मक खेळणी, वॉटर पार्क तसेच विविध सुविधांचा समावेश करण्यात आला होता. कोरोना काळात प्रकल्प बंद राहिल्याने त्या कालावधीची मुदतवाढ देण्यासंदर्भात तसेच प्रकल्पाला दीर्घ मुदतवाढ देण्याबाबत महापालिका स्तरावर हालचाली झाल्या आहेत. मात्र, प्रकल्पाला दीर्घ मुदतवाढ देण्यापूर्वी नेमके काय नवीन विकसित केले जाणार आहे, याची स्पष्टता आवश्यक असल्याचे काटे यांनी म्हटले आहे.

प्रस्तावित उपक्रमांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी

अप्पू घरमध्ये भविष्यात कोणते नवीन उपक्रम सुरू केले जाणार आहेत? कोणत्या प्रकारची मनोरंजनात्मक खेळणी अथवा साहसी उपक्रम विकसित केले जाणार आहेत? या प्रकल्पाचे नियोजन कोण करीत आहे? प्रकल्पासाठी वास्तुविशारद, डिझायनर किंवा विशेष तज्ज्ञ सल्लागार कोण आहे? या सर्व बाबींची माहिती स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याची मागणी काटे यांनी केली आहे. तसेच प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण शहरातील प्रमुख नेते, विविध राजकीय पक्षांचे मान्यवर आणि संबंधित क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींसमोर करण्यात यावे, अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा –  Krishna Shroff : टायगर श्रॉफची बहीण ते यशस्वी Founder; फिटनेस आणि MMA क्षेत्रात कृष्णाची दमदार भरारी

नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

अम्युजमेंट पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आणि लहान मुले येत असल्याने सुरक्षिततेच्या निकषांमध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये, असे काटे यांनी पत्रात नमूद केले आहे. प्रस्तावित साधनांची गुणवत्ता व ग्राह्यता कोण निश्चित करणार? कोणत्या नोंदणीकृत कंपन्यांची उपकरणे व प्रॉडक्ट वापरले जाणार? त्यांची गुणवत्ता तपासणी कशी होणार? शासनाच्या आवश्यक सुरक्षा परवानग्या कोणत्या असतील आणि त्या मिळविण्याचे नियोजन काय आहे? यासह विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

तज्ज्ञ संस्थेच्या सल्ल्याची आवश्यकता

अशा स्वरूपाच्या मोठ्या मनोरंजन प्रकल्पासाठी विशेष अनुभव असलेल्या आर्किटेक्ट, डिझायनर तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्थांचा अधिकृत सल्ला घेणे आवश्यक असल्याचे काटे यांनी स्पष्ट केले आहे. प्रकल्पाची संपूर्ण माहिती, नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था निश्चित झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मान्यता, अंमलबजावणी किंवा कामाचे आदेश देऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, अप्पू घर हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा पर्यटन व मनोरंजन प्रकल्प असल्याने त्याचा विकास व्हावा, मात्र त्याचवेळी नागरिकांची सुरक्षितता, दर्जेदार सुविधा आणि पारदर्शक नियोजन यांना सर्वोच्च प्राधान्य मिळावे, अशी काटे यांची भूमिका आहे. अधिकृत माहिती व प्रस्तावित प्रकल्पाचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होईपर्यंत मुदतवाढीचा निर्णय घेऊ नये, अशी स्पष्ट विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“अप्पू घर हा पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा विकास आणि आधुनिकीकरण व्हावे, ही आमचीही भूमिका आहे. मात्र, नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रस्तावित उपक्रम, साहसी खेळ, खेळणी, तांत्रिक नियोजन, सुरक्षा मानके, उपकरणांची गुणवत्ता आणि आवश्यक शासकीय परवानग्या याबाबत महापालिकेने पूर्ण पारदर्शकता ठेवावी. तज्ज्ञ आर्किटेक्ट, डिझायनर आणि संबंधित क्षेत्रातील अनुभवी संस्थांचा अधिकृत सल्ला घेतल्याशिवाय प्रकल्पाला मुदतवाढ किंवा पुढील मान्यता देऊ नये. संपूर्ण माहिती आणि सुरक्षा व्यवस्था स्पष्ट झाल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, ही आमची ठाम भूमिका आहे.”

— शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा)

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button