साई मेरीगोल्ड सोसायटीचा स्तुत्य उपक्रम: जुन्या सायकली दुरुस्त करून गरजू व आदिवासी मुलांना वाटप

पिंपरी-चिंचवड | सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचा अनोखा आदर्श घालत पिंपळे सौदागर येथील साई मेरीगोल्ड सोसायटीतील नागरिकांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. सोसायटीत दीर्घकाळापासून वापराविना पडून असलेल्या सायकलींची दुरुस्ती करून त्या गरजू आणि अनाथाश्रमातील मुलांना मोफत वाटण्यात आल्या.
सोसायटीत अनेक जुन्या सायकली धूळ खात पडून होत्या. या सायकलींचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने सोसायटीचे चेअरमन प्रदीप खंदारे पाटील, सचिव संदीप भुंजाळ आणि खजिनदार नंदा बर्डे यांनी नागरिकांना त्या दान करण्याचे आवाहन केले होते. या हाकेला रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःच्या खर्चाने व मेहनतीने सायकली दुरुस्त करून घेतल्या.
या उपक्रमांतर्गत काळेवाडी येथील ‘स्पंदन बाल आश्रम’ आणि आदिवासी भागातील गरजू मुला-मुलींना सुमारे २० सायकलींचे वाटप करण्यात आले. नव्या रूपात मिळालेल्या सायकली पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर हा क्षण पाहून सोसायटीतील नागरिकही भावूक झाले. “ही केवळ सायकलींची देणगी नसून मुलांच्या स्वप्नांना गती देणारा प्रयत्न आहे,” अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.
हेही वाचा
“डीजेच्या वादात पडू नका, सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा”; मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांना आवाहन
नागरिकांचे मोलाचे योगदान
या उपक्रमासाठी सोसायटीतील नागरिकांनी वेळ, सायकली, आर्थिक मदत आणि दुरुस्तीच्या स्वरूपात सहकार्य केले. प्रशांत कुलकर्णी, संदीप गुंजाळ, हर्षल बर्डे, प्रशांत पोहरे, विष्णुकांत पांडे, अमित सोनार, दीपक देसाई, स्वप्नील महाजन, हर्षल पाटील, अतुल सिंघल, चेतन मोरे, शशांक भूधर, तुषार पाटील, जय नाईक, शब्बर हुसेन, वीरेंद्र ताजणे, अमित गुप्ता, पंकज माने, विनोद पाटील, अमित रसाळ, सनी राजेश, श्रीकांत जाधव, श्रीकांत लोंधे, राहुल चिंतावर आणि अविनाश फुलारी यांच्यासह अनेक सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
साई मेरीगोल्ड सोसायटीच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, पुणे व महाराष्ट्रातील इतर गृहनिर्माण सोसायट्यांनीही अशा सामाजिक उपक्रमांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.
सोसायटीत पडून असलेल्या निरुपयोगी सायकलींची दुरुस्ती करून त्या गरजू मुलांपर्यंत पोहोचवल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच आमच्या या उपक्रमाचा खरा पुरस्कार आहे.
– प्रदीप खंदारे (अध्यक्ष/संस्थापक, न्यू पुणे पब्लिक स्कूल, निगडी व चेअरमन, साई मेरीगोल्ड सोसायटी.




