विदर्भात पावसाची दडी; ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट, २ ते ५ सप्टेंबरदरम्यान दिलासा मिळण्याची शक्यता
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट; ४ सप्टेंबरला गोंदियासाठी ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज

नागपूर : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राहिले आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असताना शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. मात्र, येत्या २ ते ५ सप्टेंबरदरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांत चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याने काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
नागपूर हवामान विभागाने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी २ ते ५ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ४ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, यंदा विदर्भात ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. अनेक भागांत पावसाअभावी शेतीवरील संकट गडद झाले असून पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. आगामी काही दिवसांत होणारा पाऊस ही तूट कितपत भरून काढतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटील यांच्या शुगर रिपोर्टवर सवाल; “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एल निनोचा प्रभाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा पावसाच्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात एल निनो अधिक मजबूत झाल्यास पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भात सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पाऊस होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे चित्र आहे.
यंदा संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात ६९ टक्के, विदर्भात ५८ टक्के, तर राज्यात सरासरी ४६ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.





